माण-खटावमध्ये राजकीय भूकंप; जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश

by Team Satara Today | published on : 01 October 2026


​सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण-खटाव तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे माण-खटावसह सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
​शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख राहिलेले शेखर गोरे हे भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सख्खे बंधू आहेत. सहकार क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र आणि भक्कम जाळे निर्माण केलेले शेखर गोरे गेल्या काही काळापासून जयकुमार गोरे यांच्यापासून राजकीयदृष्ट्या दुरावले होते. जिल्हा बँक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शेखर गोरे यांनी थेट शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्याने माण-खटावमध्ये दोन सख्खे भाऊ आता वेगवेगळ्या पक्षांतून आमनेसामने ठाकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रवेशामुळे महायुतीतच स्थानिक पातळीवर अंतर्गत राजकीय वर्चस्वाची स्पर्धा रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
​पक्षप्रवेशानंतर बोलताना शेखर गोरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यातील विकासकामे आणि जनकल्याणकारी योजनांमुळेच महायुतीला जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचे सांगत, जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा बँक आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये माण-खटावची लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूज, दहिवडी, फलटण मार्गावर ९ ऑक्टोबरपासून विना वाहक विना थांबा बसेस - विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांची माहिती

संबंधित बातम्या