धनंजय मुंडेंनी राजीनामा देताच जरांगे पाटलांनी केली मोठी मागणी!

by Team Satara Today | published on : 05 March 2025


जालना : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि.4) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केल्यानंतर मुंडेंनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यावर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. ‘मुंडे यांना आमदारकीपासून दूर ठेवा. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करत होता का? देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणीही मनोज जरांगेंनी केली.

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे की, अधिवेशनात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रश्न धरुन लावावा’.

तसेच हैद्राबाद संस्थान गॅझेट लागू करावं, सातारा, बॉम्बे गॅझेट माणुसकी दाखवून लागू करावे. समाजावर केलेल्या सर्व केसेस सरसकट मागे घेण्याचं कबूल केलं होतं. शिंदे, फडणवीस यांनी हे कबूल केलं आता शब्दाला मागे फिरू नये. आम्ही ८-९ मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर अधिवेशन काळात व्यापक आंदोलन करावं लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांचं कार्यालय चालवण्याचं काम वाल्मिक कराड करत होता. यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. फरार आरोपी याला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. मोबाईल देखील फेकून दिला. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामापर्यंत कॉल डिटेल आली पाहिजे. धनंजय मुंडे यांना पुरवणी जबाबात घेणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी मंत्रिपद आणि आमदार पदापासून दूर ठेवलं पाहजे. ३०२ मध्ये अटक केली पाहिजे, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विरोधकांवर हक्कभंग आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
पुढील बातमी
जागरण फिल्म फेस्टिव्हलच्या १२ व्या आवृत्तीचा ग्रँड फिनाले मुंबईत होणार!

संबंधित बातम्या