सातारा जिल्हा परिषदेचा गौरव

पंचायत विकास निर्देशांकमध्ये यश; मंत्री गोरेंनी केला सन्मान

by Team Satara Today | published on : 26 August 2025


सातारा : पंचायत विकास निर्देशांकमध्ये राज्यातील प्रथम दहा जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व राज्यस्तरावरील टीमचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ९ व्या स्थानावर सातारा जिल्हा परिषद असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांचा, सर्व पंचायत समित्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या पंचायत समिती खंडाळाचे गट विकास अधिकारी अनिल वाघमारे यांचा, तसेच ग्रामपंचायत विभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या मान्याचीवाडी, ता. पाटणचे सरपंच रवींद्र माने यांचा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडील मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळा पुणे येथे आज पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री गोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रामध्ये ग्रामपंचायत डव्वा (एस), ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथील सरपंच योगेश्वरी चौधरी यांचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री गोरे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

पंचायतराज, पुणेचे संचालक गिरीश भालेराव यांनी स्वागत केले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने सादरीकरण केले. डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी लोकसहभागाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. 'यशदा' येथील प्रविण प्रशिक्षक लक्ष्मीकांत शिंदे यांनी जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्या सरपंच योगेश्वरी चौधरी, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी मनोगते व्यक्त केली.

पंचायत विकास निर्देशांकमध्ये सातारा जिल्हा परिषदेने तसेच खंडाळा पंचायत समितीने व मान्याचीवाडी, ता. पाटण यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढला असून, या कामगिरीचा आलेख अधिक उंचावण्याचा प्रयत्न भविष्यात असणार आहे. तसेच मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये देखील सातारा जिल्हा परिषद अग्रस्थानी राहील.
- याशनी नागराजन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगरीत उद्या बाप्पांचे होणार स्वागत
पुढील बातमी
४८ तासात दोषारोपपत्र दाखल ; वडूज पोलिसांची तत्परता

संबंधित बातम्या