'काशिनाथाचं चांगभलं'च्या जयघोषात बावधनची बगाड यात्रा उत्साहात

पारंपरिक वाद्यांच्या गजर; परदेशी पर्यटकांसह लाखो लोकांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 19 March 2025


सातारा : ‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, बावधन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाची बगाड यात्रा मोठया उत्साहात पार पडली. परदेशी पर्यटकांसह मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. आजच्या बगाड यात्रेला राज्यभरातून तसेच परदेशातून अनेक लोक बगाड यात्रा पाण्यासाठी आले होते. ब्राझील येथील काही पर्यटक यात्रा पाण्यासाठी आले होते. 

पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याच्या बावधन (ता. वाई) येथील प्रसिध्द बगाड यात्रा दरवर्षी माघवद्य पंचमीला (रंगपंचमी) होते. गावातील भैरवनाथ मंदिरात होळी पौर्णिमेस ज्याच्या बाजुने कौल मिळतो अशा बगाडय़ास शिडावर चढविण्यात (बांधण्यात) येते. या वर्षीचा बगाडय़ा अजित ननावरे (वय ३९) याच्याकडून कृष्णातिरावरील सोनेश्वर येथे भैरवनाथ व ग्रामदैवतांची सकाळी साडेनऊच्या दरम्यान पूजा झाल्यावर सकाळी अकराच्या सुमारास बगाडास बैल जुंपण्यात आले. बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदैवताच्या पालख्या असतात. एका वेळी किमान दहा जे बारा बैल बगाडाच्या रथास जुंपण्यात येतात. शिवारातील किमान पाचशे बैलाच्याव्दारे बगाड ओढून गावात आणले जाते. दगडी चाके असलेला रथ म्हणजे बगाड. बगाड संपूर्ण गावच्या व लगतच्या गावच्या शेतातली लाकडात तयार करण्यात येते. त्याचे साहित्य म्हणजे लाकडी कणा, कुण्या, दोन दगडी घडीव चाके, दांड्या, बैल जुंपण्यासाठी जोटे किंवा जू, जुपण्या, मध्यभागी आडवे मोठे खाच असलेले चौकोनी लाकूड (वाघला), मध्यभागी उभा खांब (खांबला), बाहुली, शीड, पिळकावण्या, वाकापासून तयार केलेली चऱ्हाटे (जाड दोरखंड), पुढे बैल जुंपण्यास शिवळा इत्यादी. संपूर्ण बगाडाच्या रचनेत लोखंडाचा अजिबात वापर केलेला नसतो हे वेगळे वैशिष्ट्य. बावधन गावात बगाड येईपर्यंत शिवाराप्रमाणे बैल जोडय़ा बदलण्यात येतात. त्यामुळे गावातील सर्व समाजांना व भावकींना बगाड ओढण्याचा मान मिळतो. कोणताही भाडणतंटा राहात नाही.गावातील शेतकऱ्याच्या बगाड यात्रेसाठी बैल पाळण्याची प्रथा आजही आहे.सर्व बैल धष्टपुष्ट असतात. सकाळी बगाड निघाल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान बगाडाची चाके शेतात रुतली होती. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शेड पुन्हा बघाडावर चढवून मिरवणूक सुरू झाली. 

दुपारी साडेपाचच्या दरम्यान बगाड शेतशिवारातून पक्क्य़ा रस्त्यावर आले. नंतर ते वाई सातारा रस्त्यावर आले आणि आठच्या दरम्यान बावधन गावात पोहोचले. यावर्षी बगाड मिरवणुकीनिमित्त गावकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले होते. आज किमान तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी बगाडाचे दर्शन घेतले. रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले होते. 

 उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिंग वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अमोल गवळी उपनिरीक्षक बिपिन चव्हाण सुधीर वाळुंज यांच्यासह आठ पोलीस अधिकारी दंगाविरोधी पथक असे शंभरावर पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. एकूनच मोठय़ा उत्याहात बगाड यात्रा पार पडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागपूरच्या जिहादी वृत्तींवर कठोर कारवाई व्हावी
पुढील बातमी
बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या