"दोषींची गय करू नका - टीईटी पेपर फुटीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तातडीचे आदेश

६ लाख उमेदवारांना धक्का; विरोधक आक्रमक

by Team Satara Today | published on : 28 June 2026


मुंबई : महाराष्ट्रात रविवार २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षाचा पेपर लीक झाल्यामुळे ६ लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकरणानंतर राज्य सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

टीईटी पेपर फुटीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांशी फोनवरून चर्चा केली. "या संपूर्ण रॅकेटमध्ये जे कोणी सामील असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका," असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्री दादा भुसे यांनाही फोन करून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि प्रशासकीय पातळीवर आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.

भिवंडीत पडला होता छापा

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोडे यांना २७ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला होता. तेथे रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेच्या अनेक प्रती जप्त करण्यात आल्या. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर हा पेपर २८ जूनच्या परीक्षेचाच अधिकृत पेपर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी बिहार आणि हरियाणातील तीन संशयितांना अटक केली असून या रॅकेटचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे.

६ लाख उमेदवारांना धक्का; विरोधक आक्रमक

नीट-युजीनंतर लगेचच महाराष्ट्रात झालेल्या या पेपर लीकमुळे राज्यभरातील ६ लाख परीक्षार्थींना मोठा मानसिक धक्का बसला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'X' वर पोस्ट करत, "देशातील परीक्षा पद्धतीला केवळ वसुलीचे साधन बनवले गेले असून ही तरुणांच्या भविष्याशी मोठी फसवणूक आहे," अशी टीका केली. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी "भाजपने पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारे पेपर लीक रोखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते," असा टोला लगावला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली
पुढील बातमी
वाई न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या २८ झाडांना जीवदान ; बांधकाम विभागाच्या यशस्वी उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक

संबंधित बातम्या