सातारा : संकट कितीही मोठे असले, तरी जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची प्रेरणा असेल, तर यश निश्चित मिळते, याचे प्रेरणादायी उदाहरण विरमाडे (ता. वाई) येथील वीरपत्नी सोनल विजय सोनावणे यांनी घालून दिले आहे. पतीच्या अकाली निधनाचे दु:ख मनात ठेवत न बसता त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला आणि अखेर इंडो-तिबेट पोलिस दलामध्ये निवड मिळवून आपल्या कुटुंबासह विरमाडेचे नाव उंचावले आहे.
सोनल सोनावणे यांचे पती विजय सोनावणे हे देशसेवेत कार्यरत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते सुटीसाठी आपल्या मूळ गावी विरमाडे येथे आले असताना आनेवाडी टोलनाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने केवळ सोनावणे कुटुंबावरच नव्हे, तर विरमाडे गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. कर्तव्यदक्ष जवानाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली होती.
पतीच्या निधनानंतर सोनल यांच्यावर दोन मुलांच्या संगोपनाची आणि कुटुंबाची जबाबदारी एकहाती आली. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी खचून न जाता धैर्याने आयुष्याला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला. पतीने जपलेले देशसेवेचे स्वप्न पुढे नेण्याचा निर्धार करत त्यांनी इंडो-तिबेट पोलिस दलाच्या भरतीची तयारी सुरू केली.
सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सर्व टप्पे यशस्वीपणे पार केले आणि अखेर इंडो-तिबेट पोलिस दलात निवड झाली. त्यांच्या या यशामुळे विरमाडे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.