जिल्ह्याला पावसाने झोडपले

by Team Satara Today | published on : 19 August 2024


सातारा : गेल्या तीन-चार दिवसांत हवेत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवत होता. पण आज सोमवारी सातारा शहरासह जिल्ह्याला दुपारपासून पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाण्याचे लोट वाहत होते. फलटण, माण, खटाव या दुष्काळी भागातील ओढ्यांनाही चांगले पाणी आले होते. दरम्यान, खरीप हंगामातील बाजरीच पिक ऐन फुलोऱ्यात आलं असताना या जोरदार पावसाने काही ठिकाणी जमीनदोस्त झाले आहे, तर शहरात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही धावपळ करावी लागली. तसेच विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले.
मान्सूनच्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून जवळपास १५ ते २0 दिवस जिल्ह्यात तुफान पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांमध्ये उन्हाचा चटका कमालीचा जाणवत होता. जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. हवेतील आद्रतेमुळे उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले होते. दुपारनंतर जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, माण, फलटण तालुक्यासह सर्वत्रच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पाऊस कमी होत गेला. त्यातच मागील आठवड्यात पावसाची पूर्ण दडी होती. पण, तीन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. शनिवारी आठवड्यानंतर शहरात पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले होते. तसेच रस्त्याचीही वाट लागली. रविवारी दिवसभर उकडत होते. त्यामुळे दुपारनंतर पाऊस होईल, अशी चिन्हे होती. मात्र, पावसाने पाठ फिरवली. तरीही सोमवारी जोरदार पाऊस झाला.
सातारा शहरासह जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी चारपासून आकाशात काळे ढग जमू लागले.  अन बघता-बघता जोरदार पावसाला सुरूवात झाली. क्षणात रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागले. खरीप पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे, तर काही भागातील बाजरीचे फुलोऱ्यात आलेले पिक जमीनदोस्त झाले आहे. या पावसाने रस्त्याच्या बाजुला बसलेल्या विक्रेत्यांचे हाल झाले. काहींचे सामान भिजले. तसेच दररोजच सायंकाळच्या सुमारास सातारकर खरेदीसाठी बाहेर पडतात. सोमवारी सायंकाळीही खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला.

दुष्काळी भागात पावसाला सुरूवात
जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी दुष्काळी तालुक्यात ऑगस्टच्या मध्यापासूनच पाऊस पडत असतो. यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस हा महत्वाचा ठरतो. सध्याही पूर्व भागात पाऊस होत आहे. मागील तीन दिवसांत तर अनेक गावांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरीचे फुलोऱ्यात आलेलं पिक जमीनदोस्त झाले आहे. तर सोमवारी दिवसभरात पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तरीही कोयना धरणात आवक वाढल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात प्रथमच झाली रक्षाबंधनाची पत्रकार परिषद
पुढील बातमी
सातार्‍यात रक्षाबंधनाचा सण पारंपारिक उत्साहाने साजरा

संबंधित बातम्या