प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकत्रिकरणाच्या तर्कवितर्कांना दिला पूर्णविराम; राष्ट्रवादी ‘एनडीए’सोबत सत्तेतच राहणार

by Team Satara Today | published on : 02 February 2026


सातारा :  आम्ही ‘एनडीए’सोबत आहोत आणि पुढेही ‘एनडीए’सोबतच राहणार आहोत. विलीनीकरणाच्या निर्णयाला जे अनुकूल असतील त्यांनी स्वतः त्याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सोमवारी कराडच्या प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करत राहणार आहे. दादांच्या नेतृत्वाखालचा हा पक्ष मजबूत आहे, आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी जे काही म्हटले आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, जनतेने विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आम्ही भाजपप्रणीत एनडीएमध्ये आहोत आणि सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देश गतिमान करण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असून, ती दादांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचे आमचे कर्तव्य आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. मात्र, एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत राहण्याची आमची भूमिका ठाम आहे. विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर उत्तर देताना तटकरे यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार, याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पाहावे, असे ते म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील वाढत्या अतिक्रमणांचे नगराध्यक्षांकडे गाऱ्हाणे; सतर्क सातारकरांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट :अतिक्रमण हटावचे धोरण ठरणार
पुढील बातमी
महाराष्ट्राच्या विकासाचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या