कराड : चुकीच्या प्रवृत्तींना रोखून सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासह दडपशाहीचे वातावरण मोडून काढून कृष्णा कारखान्याला पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी संस्थापक पॅनेलला ताकदीने मदत करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केले. सहकार क्षेत्राचा वापर केवळ राजकीय हेतूने आणि विरोधकांना संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करून त्यांनी सभासदांना परिवर्तनाची हाक दिली.
यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, संस्थापक पॅनेलच्या नेत्या अर्चना मोहिते उपस्थित होत्या.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात सहकारी संस्था, मेडिकल कॉलेज आणि दूध संस्था याशिवाय राजकारण करणे कठीण झाले आहे; परंतु कारखान्याचा वापर बेकायदेशीर पद्धतीने निवडणुका जिंकण्यासाठी आणि विरोधी पक्ष संपवण्यासाठी केला जात असेल, तर ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. राजकारण वेगळे आणि सहकार वेगळे, असे म्हणणारे लोक आता सत्तेत आहेत.
प्रत्यक्षात सहकारी कारखाने हेच पैसा गोळा करण्याचे माध्यम बनवले आहेत. कारखान्यातील वाहतूक खर्चाचा अनाठायी बोजा वाढवला जात असून, तो रोखणे शक्य आहे. कार्यक्षेत्रातील ऊस वेळेवर उचलला जात नाही, उलट बाहेरून तीन-चार लाख टन ऊस आणून वाहतुकीचा खर्च अवाजवी वाढवला जातो. हे टाळल्यास दर वाढवणे सहज शक्य आहे. संस्थापक पॅनेलने १२० किलो साखर, पाणीपट्टी माफी आणि ऊस दर आदी गोष्टी शक्य आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘मी कृष्णा कारखान्याचा सभासद नाही. मात्र, १९९४-९५ च्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही सभासद नसताना पूर्ण ताकदीने उतरलो होतो. त्यामुळे कारखान्यात जर काही चुकीचे घडत असेल, तर त्याचा जाब विचारण्याचा नैतिक अधिकार मला नक्कीच आहे.’’
‘स्थानिक स्वराज्य’ला पैशांचा वापर
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘विधान परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचे भाजपला आदेश आहेत. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होत आहे. देशातील लोकशाही कमकुवत होत असून, भ्रष्टाचारातून मिळणारा पैसा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापरला जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना पूर्ण पाठिंबा आहे. मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे.’’