अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालयाने भाग 2 भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीच्या निर्णयामुळे सुमारे 75238 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ही मुदत 6 जून दुपारी 12 वाजून 15 मिनिटं ते 7 जून दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 5 जून या कालावधीत अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. या दरम्यान 11 लाख 29 हजार 924 विद्यार्थ्यांनी दोन्ही भागात अर्ज (भाग 1 व भाग 2) केले. मात्र, 1 लाख 41 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यापैकी अनेकांनी फक्त 1 भाग भरण्याची संधी मिळाली तर भाग 2 भरण्यापासून लाखो विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले होते. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने भाग 2 भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
75,238 विद्यार्थ्यांना मिळणार संधी
विशेषतः 75,238 विद्यार्थ्यांनी भाग 1 पूर्ण केला असून भाग 2 भरलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठीच शिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत अर्जाचा भाग 2 भरावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी भाग 2 भरला नाही, तर त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही, तसेच पहिल्या फेरीत प्रवेशाची संधीही मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भाग 2 भरलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात बदल करण्याची सुविधा या कालावधीत उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक पसंतीक्रम निवडावा, असेही आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
5 जून 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही, किंवा भाग 1 अर्धवट भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रवेश फेरीच्या सुरुवातीला नव्या अर्जाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शिक्षण संचालनालयाने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.