महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरिस्थान पालिकेच्या विकासकामांमध्ये नेहमी चर्चेत राहणाऱ्या लाडक्या ठेकेदाराने येथील दूध डेअरीच्या खालच्या बाजूस केलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अवघ्या चार महिन्यांतच उघड झाला आहे. ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडून रस्ता खचला असून, एका ठिकाणी रस्त्याखालची माती वाहून गेल्याने मोठी पोकळी निर्माण होऊन काँक्रिटचा भाग अधांतरी लटकला आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विभागप्रमुख हेमंत (सोनू) साळवी यांनी निकृष्ट काम पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, साळवी यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली असता मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत लवकरच संयुक्त बैठक लावू, असे आश्वासन त्यांनी साळवी यांना दिले.
शहरातील दूध डेअरीच्या खालच्या बाजूस पुणे येथील व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस या ठेकेदारामार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे. अवघ्या चार महिन्यांत झालेली ही अवस्था ठेकेदाराच्या गुणवत्तेचा आणि प्रशासनाच्या देखरेखीचा पर्दाफाश करणारी ठरली आहे. अशा पद्धतीच्या निकृष्ट कामामुळे सार्वजनिक निधीचा विनियोग आणि गुणवत्ता तपासणी नेमकी कशी होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच काँक्रिटचे खराब अवशेष व रिकामी सिमेंटची पोती परिसरात टाकून पर्यावरणाची हानी केली जात असताना पर्यटकांकडून प्रदूषण कर वसूल करणाऱ्या नगरपरिषदेने स्वतःच्या कामांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची जबाबदारीही घ्यायला पाहिजे, अशी मागणी शहरातून होत आहे.
या प्रकाराची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधींसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोरीच्या ठिकाणी आवश्यक पाइप टाकण्यात आला नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला. पूर्वीच्या नैसर्गिक ओहोळाचा प्रवाह योग्य पद्धतीने पुढे नेण्यासाठी आवश्यक पाइप व्यवस्था न करता थेट काँक्रिटच्या गटारातून पाणी वाहून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गटाराखालून पाण्यासोबत माती वाहून गेल्याने रस्त्याखाली पोकळी निर्माण झाली आणि रस्ता खचला. याच परिसरातील पुढील मोरीजवळही भविष्यात रस्ता खचण्याची शक्यता पाहणीत व्यक्त झाली. त्यामुळे या कामातील नियोजनशून्यता स्पष्ट होत आहे.
महाबळेश्वरमध्ये निकृष्ट कामाचा नमुना, चार महिन्यांतच खचला काँक्रिट रस्ता; शिंदे गटाचे विभागप्रमुख हेमंत साळवी यांनी उठवला आवाज
by Team Satara Today | published on : 23 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा