कराड : कराड पालिकेच्या बहुउद्देशीय हॉलसमोरील शिंदे हॉस्पिटलसमोर आज शनिवारी पहाटे झालेला अपघात नसून तो खूनच असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कराड शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासातच याचा उलगडला केला. जलसंपदा विभागातील अभियंत्यांच्या खुनाच्या कटाचे पत्नी आणि मेहुणाच सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने पतीच्या खुनाचा कट रचुन त्यासाठी सुपारी दिल्याचे तपासातुन समोर येत आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय-५४, रा. मनव, ता. कराड) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव असून खुनप्रकरणी त्यांची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय-36, रा. मनव, ता. कराड) आणि मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय-४०, रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) अशी याप्रकरणी अटक केल्याची नावे असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी - लक्ष्मण मंडले व पत्नी सुरेखा मंडले यांचेमध्ये कौटुंबिक वाद होता. पती आपणास त्रास देत आहे ही बाब मनात ठेवून सुरेखा मंडलेने एक महिन्यापूर्वी भावाच्या मदतीने मुंबई येथे जाऊन पतीचा काटा काढायचा प्लॅन केला होता. त्यानुसार आज पहाटे साडेपाचच्या सुमारास शिंदे हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीला चारचाकी वाहनाने उडवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताच्या पत्नीने पोलिसांना ही अपघाताची घटना असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून पोलिसांना संशय आला.
तपासात एक मोटर मंडले यांच्या पाठीमागून आली, त्यांना धडकुन पुढे गेल्यानंतर संयीतांने त्यांच्या जवळील बॅग आणि साहित्य घेऊन पळ काढला. त्याचबरोबर काही वेळाने पुन्हा मोटर घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे मृत लक्ष्मण मंडले यांच्या पत्नीस चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तिला पोलिसी खाक्या दाखविताच तिने भावाच्या मदतीने पतीला मारण्यासाठी दोघांना सुपारी दिल्याची निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी मृत लक्ष्मण मंडलेची पत्नी व मेहुण्यास अटक केली असून आणखी सुपारी घेणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.
तपासासाठी पाच पथके रवाना
अभियंत्याचा अपघात नसुन तो खुन असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवुन याप्रकरणातील संशयीतांच्या शोधासाठी हालचाली केल्या. त्यामध्ये पहिल्यांदा पत्नी आणि मेहुन्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडुन सुपारी देवुन कट करण्याच आल्याचे पुढे आल्यानंतर संशीतांच्या शोधासाठी शहर पोलीस ठाण्याची तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.