उत्स्फूर्त प्रतिसादात सज्जनगड रन उत्साहात ; महिलांच्या गटात दिशा फडतरे तर पुरुष गटात जयम फडतरे प्रथम, भर पावसात हिरवाईंने नटलेल्या गडावर स्पर्धक सुखावले.

by Team Satara Today | published on : 16 August 2026


सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीनेआज रविवारी सकाळी सज्जनगड रन 2026 चे आयोजन करण्यात आले होते.

या समर्थ दौडीचा शुभारंभ भर पावसात आणि उत्साही स्पर्धकांच्या ..जय भवानी जय शिवाजी,.. जय जय रघुवीर समर्थ.. च्या जयघोषात कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांच्या शुभहस्ते गजवडी ते सज्जनगड रस्त्यावरील स्वागत कमानीपासून झेंडा फडकून करण्यात आला .दौडमार्गावर पावसाच्या सरी कोसळत असतानाही स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने ही दौड यशस्वीपणे पार केली .सज्जनगड येथे अंतिम टप्प्यांमध्ये पायऱ्या चढून वर आल्यानंतर पावसाळी वातावरणातच धुक्याचा नजारा आणि एकंदरीतच हिरवागार निसर्ग हा स्पर्धकांचा उत्साह अधिक वाढवताना दिसत होता.

संपूर्ण राज्यातून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद

या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. रविवारी पहाटे या सज्जनगड रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले, कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी, प्रवीण कुलकर्णी गुरुजी ,समर्थ भक्त विद्याधरबुवा वैशंपायन,गजाननराव बोबडे , तसेच समर्थ मंडळाचे सहकारी संतोष वाघ ,उत्तम तारळेकर,आदित्य देशपांडे व सज्जनगड वरील रामदासी मंडळींच्या उपस्थितीत गजवडी येथील अभयसिंहराजे भोसले विद्यालयाच्या वरील बाजूस असलेल्या स्वागत कमानी पासून ध्वज फडकावून करण्यात आली.

समर्थ रामदास स्वामींच्या नावाचा जयजयकार

तत्पूर्वी सर्व स्पर्धकांनी विद्यालयाच्या प्रांगणात वॉर्मअप करून स्पर्धेची तयारी केली .स्पर्धा सुरू होताना मान्यवर उपस्थित यांच्या हस्ते तसेच सर्व स्पर्धकांनी समर्थ रामदास स्वामींच्या नावाचा जयजयकार करत मनाचे श्लोक म्हणत ही अनोखी सज्जनगड रन 2026 सुरू झाली .हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या सज्जनगडच्या अतिशय चढण असलेल्या रस्त्यावरूनही हे धावपटू अतिशय लीलया हे अंतर धावत कापत होते .मार्गांमध्ये ज्ञानश्री इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटच्या प्रांगणाबाहेर मार्गावर स्पर्धकांसाठी पाणी तसेच या धावपटूंना उत्साहित करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मार्गावरून टी-शर्ट घातलेल्या धावपटूंना पाहताना अतिशय एक वेगळेच रम्य असे खेळाडूंचे दर्शन उपस्थिताना झाले .त्यानंतर या स्पर्धेतील शेवटचा अंतिम टप्पा म्हणजे सुमारे दीडशे पायऱ्यांची चढण पूर्ण करत हे सर्व धावपटू समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणात या सर्व धावपटूंचा रामनामी प्रसाद तसेच पुष्पगुच्छ देऊन समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी,ज्येष्ठ समर्थ भक्त जनार्दन बुवा शेवडे, राजाभाऊ कुलकर्णी रामदासी,स मर्थ सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रवीण कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र, राम वस्त्र व सहभाग घेतल्याबद्दल अल्पोपहार देण्यात आला. या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ उंब्रज या संस्थेकडून संस्थेचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. विवेकानंद जोशी तसेच सेक्रेटरी रो. देवदत्त शिंदे व संस्थेच्या सभासदांकडून मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

महिलांच्या गटात दिशा फडतरे तर पुरुष गटात जयम फडतरे प्रथम

या स्पर्धेत 11 किलोमीटर गटात महिलांच्या 13 ते 30 वयोगटात दिशा फडतरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर यामध्येच पुरुष गटात जयम फडतरे, अनिश जर्दी, प्रतीक वायल यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.  महिलांच्या   30 ते 50  वयोगटात   अकरा किलोमीटर स्पर्धेत स्मिता शिंदे ,शितल फडतरे ,प्रमिला सपकाळ विजय ठरल्या .तर 11 किलोमीटरच्या 30 ते 50 पुरुष गटात सचिन मोरे, राजेंद्र सपकाळ, विशाल पाटील विजयी झाले .११ किलोमीटरच्या 50 वर्षावरील पुरुष गटात रवींद्र जगदाळे, मोहन शेळके आणि भाग्येश ताटके विजय ठरले. पाच किलोमीटर गटात 13 ते 30 महिलांच्या गटामध्ये सानवी घडशी, नंदिनी करोडीवाल आणि समृद्धी खोपडे विजयी झाल्या. पाच किलोमीटर 13 ते 30 पुरुषांच्या गटात सत्यम फडतरे,गणेश भोसले आणि समर्थ मोरे विजय ठरले. पाच किलोमीटर 30 ते 50 महिलांच्या गटात विद्या साळुंखे आणि प्रिया पंडित विजयी झाल्या .पाच किलोमीटर 30 ते 50 पुरुषांच्या गटात मंगेश साबळे ,रामदास जाधव ,यश भाकरे विजय ठरले .पाच किलोमीटरच्या 50 व त्यावरील महिलांच्या गटात भाग्यश्री देशपांडे, डाॅ.अपर्णा भाकरे, आणि डॉ.अपर्णा कुलकर्णी विजयी झाल्या. याच स्पर्धेत पाच किलोमीटरच्या पन्नास वर्षावरील पुरुषांच्या गटात विठ्ठल  अरगडे, मारुती फडतरे आणि प्रकाश जानकर विजयी झाले.

यावेळी उपस्थित धावपटूंना मार्गदर्शन करताना समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी म्हणाले की ,श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्यांचा मंत्र द्यावा यासाठी ही समर्थ सज्जनगड 2026 आयोजित करण्यात आली होती .अतिशय चढाचा हा धाव मार्ग 13 वर्षावरील पुरुष व महिलांसाठी पाच किलोमीटर , व 11 किलोमीटर अंतराच्या टप्प्यात असला तरी धावपटूंचा यामध्ये खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त सहभाग हेच या उपक्रमाचे यश आहे. निसर्गरम्य परिसरात धावपटूंना आनंद मिळाला तसेच त्यांच्यातील ऊर्जा समर्थ रामदास स्वामींनी खऱ्या अर्थाने अधिक वृद्धिंगत केली. नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे हाच या आयोजनाचा हेतू असून या स्पर्धेला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल समर्थ सेवा मंडळ आपल्या सर्वांचे अभिनंदन करत आहे.

श्री समर्थ सेवा मंडळांनी दरवर्षी हा अनोखा उपक्रम चालू ठेवावा - डाॅ. अच्युत गोडबोलेनी व्यक्त केले. 

समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य, समृद्धी आणि शांती यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्थ दौड चे आयोजन केले.या दौड आयोजनामुळे समाजात शारीरिक, आरोग्य आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवण्यासाठीच हा चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असून ज्यामुळे त्यांना शरीर आणि मन या दोघांनाही पोषण देणाऱ्या कारणासाठी एकत्र येण्याची ही संधी आहे , अशी माहिती मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त श्री योगेशबुवा रामदासी यांनी दिली.अशा प्रकारचा हा अनोखा उपक्रम श्री समर्थ सेवा मंडळांनी दरवर्षी चालू ठेवावा त्याला धावपटू निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करतील असे मत यावेळी कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोलेनी व्यक्त केले. 

या समर्थ सज्जनगड 2026 मध्ये पुरुष धावपटू बरोबरच महिला तसेच छोट्या धावपटूचाही सहभाग विशेष दिसत होता. या दौडीची सांगता या दौडीतील चार गटातील प्रथम तीन क्रमांकांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह वितरीत करण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रे ऑनलाईन देण्यात ची व्यवस्था करण्यात आली होती समर्थांचा प्रसाद वितरण झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली .मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले, योगेशबुवा रामदासी यांनी मंडळाच्या या सलग 3 वर्ष सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .समर्थ दौडीच्या आयोजनामध्ये विशेष सहकार्य म्हणून सातारा येथील दिवेकर हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य दिवेकर, त्यांचे सर्व कर्मचारी डॉक्टर्स व प्रतिनिधींनी या दौडीतील आरोग्य सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले. गडावरील वितरण व्यवस्थेत प्रसाद बुवा ,सुभाषबुवा यांनी विशेष परिश्रम घेतले या समर्थ रन साठी मुख्य प्रायोजक फेडरल बँक, सह प्रायोजक म्हणून आय. डी. बी .आय. बँक यांचे सह सातारा जिल्ह्यातील विविध नामवंत संस्था यांनी सहकार्य केले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यंदा थेट पावसाळ्यात 'ग्रेटर फ्लेमिंगो'ची राजेवाडी धरणावर हजेरी; पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण यांच्याकडून पाच प्रौढ फ्लेमिंगोची नोंद
पुढील बातमी
स्व.अरुणराव गोडबोले यांनी सामाजिक बांधिलकीचा धागा कायम ठेवला - प्राचार्य पुरुषोत्तम शेठ; रा.ना. गोडबोले ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक मदतीचे वाटप.

संबंधित बातम्या