सातारा : ''तू जास्त पुढे पुढे करतोस. माझ्या विरोधात लोकांना पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगतोस,'' असे म्हणत दोन जणांनी चिकन सेंटरमध्ये घुसून दुकानदाराला मारहाण केल्याची घटना मोळाचा ओढा येथे घडली. या राड्यात दुकानातील साहित्याची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
या प्रकरणी अर्जुन इंगळे व सागर गोसावी यांच्याविरुद्ध समीर हुसेन शेख (वय ५२, रा. पिरवाडी, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. १२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. फिर्यादीनुसार, संशयितांनी दुकानात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली तसेच साहित्याची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.