नडशीत शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

by Team Satara Today | published on : 26 July 2025


कोपर्डे हवेली : दुचाकीवरून जाणार्‍या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नडशी (ता. कराड) येथे घडली आहे. हल्ल्यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढल्याने युवक बचावला आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली असून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.

मागील महिन्यापासून नडशी परिसरात मादी बिबट्यासह तिच्या दोन बछड्यांचा वावर असल्याचे स्थानिकांसह शेतकर्‍यांनी अनेकदा पाहिले होेते. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले होते. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नव्हती. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अमोल पवार हे तळी नावाच्या शिवारात मोटर काढण्यासाठी गेले होते. 

मोटर काढून परतत असताना नडशी गावातील मुख्य रस्त्यापासून सुमारे 250 मीटर अंतरावर असताना ऊस शेतीतून बाहेर येत बिबट्याने अचानकपणे पवार यांच्या दुचाकीवर झेप घेतली. बिबट्याने झेप घेतल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून पवार दुचाकीसह रस्त्यावर पडले. यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात पवार जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर घाबरलेल्या पवार यांनी पडलेली दुचाकी उचलून घराच्या दिशेने जाणे पसंत केलते.

गावात आल्यानंतर पवार यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांसह सहकारी मित्रांना दिली. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनरक्षक सानिका घाडगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन कॅमेरा ट्रॅप लावला होता. रात्री उशिरा सातारा येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. मादी बिबट्या आणि तिच्या बछड्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वावराची माहिती स्थानिक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पसरल्याने सापळा पहाण्यासाठी गर्दी वाढली आहे. बिबट्याने हल्ला केलेल्या परिसरापासून नागरी वस्ती जवळ आहे. त्यामुळे या परिसरातील पाळीव जनावरांसह शेळ्या, पाळीव कुत्री यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच शेतात कामासाठी जाणारे शेत मजूर व रात्रीअपरात्री शेतात कामासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आमच्या समोर बिबट्याने चालू गाडीवर झेप घेतली होती. तसेच तो पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र पाठीमागून जोरात ओरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या उसात पळून गेला. केवळ वेळ चांगली होती, म्हणूनच बचावलो आहे. 

- अमोल पवार, नडशी ग्रामस्थ.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशाच्या शूर सैनिकांच्या बलिदानाच्या तुलनेत आपण कुठे आहोत?
पुढील बातमी
महिलांना शिकू द्या…अफगाणिस्तानात तालिबानविरोधात बोलल्याप्रकरणी मौलवींना तुरुंगवास

संबंधित बातम्या