सृष्टी बिरामणेच्या मृत्यूप्रकरणी साताऱ्यात मशाल मोर्चा; दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : रयत शिक्षण संस्‍थेच्‍या वायसी कॉलेजच्‍या होस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून आंब्रळ येथील सृष्‍टी बिरामणे या विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपविली. यामुळे जिल्‍हाभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस पेटत असून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांना शिक्षा व्‍हावी आणि सृष्‍टीला न्‍याय मिळावा, यासाठी नातेवाईक आणि आंब्रळकरांनीं सोमवारी सायंकाळी सातार्‍यात मशाल मोर्चा काढला.
दि. २ सप्‍टेंबर रोजी सृष्‍टी बिरामणे हिने जीवन संपविल्याची घटना घडली. तिच्या मृत्यूनंतर सातारा शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी प्राचार्य, रेक्टरसह संबंधित कमिटीवर गुन्हा दाखल करण्‍यात आला. यानंतर रेक्‍टरला अटक करण्‍यात आली तर प्राचार्यांना सक्‍तीच्‍या रजेवर पाठवण्‍यात आले आहे. या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आंब्रळ येथील सृष्‍टीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी सातारा शहरात मशाल मोर्चा काढला. सातारा तालीम संघ ते यशवंत चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज असा हा मोर्चा काढला. मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सृष्टी बिरामणे हिच्या आत्महत्येच्या घटनेने आंब्रळ परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या प्रकरणी तपासाला गती देऊन घटनेमागील संपूर्ण सत्य समोर आणावे, तसेच तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशा मागण्‍या या मोर्चात करण्‍यात आल्‍या. सातारा तालीम संघ येथून मशाल मोर्चाला सुरुवात झाली. या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. दोषी व्यक्ती कोणत्याही पदावर असोत, तपासातून त्यांची जबाबदारी निश्‍चित करून कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शनिवार पेठेत घरफोडी; सुमारे 60 हजारांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा
पुढील बातमी
‘वायसी’ वसतिगृहाच्या रेक्टरचे निलंबन; चौकशी अहवाल येईपर्यंत प्राचार्य रजेवर, पत्राद्वारे अभाविपला रयत संस्थेच्या निर्णयाची माहिती

संबंधित बातम्या