खरीप व रब्बी हंगामातील पीकस्पर्धा जाहीर

by Team Satara Today | published on : 10 July 2025


सातारा :  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२५-२६ साठी कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामातील १६ पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मूग व उडीद पिकासाठी स्पर्धेत ३१ जुलै पर्यंत तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सहभाग घेता येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप ११ व रब्बी हंगामातील ५ अशा एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांचा समावेश असून त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुकापातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार तर राज्य पातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पीकस्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट तणनाशक विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
यवतेश्वर घाटामध्ये कोसळली दरड

संबंधित बातम्या