फलटण : आई- वडिलांच्या कुशीत सुरक्षित झोपलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा श्वानांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना फलटणच्या महात्मा फुले चौकात आज सकाळी उघडकीस आली. आई- वडिलांसह झोपलेल्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याने तिला गंभीर दुखापत झाली. या जखमांमधून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान महात्मा फुले चौकातील संजीवनी आईस्क्रीम कुल्फी या गाळ्यासमोर ही घटना घडली. मयूर मुन्ना शिंदे (वय २२, रा. वाठार निंबाळकर फाटा, ता. फलटण) हे पत्नी आणि मुलांसह गाळ्यासमोर झोपले होते. त्याचवेळी झोपेत असलेल्या त्यांच्या अवघ्या तीन महिन्यांच्या मुलीवर श्वानाने हल्ला केला. श्वानाच्या चाव्यामुळे बालिकेला गंभीर जखमा झाल्या. त्यातून अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद बालिकेचे वडील मयूर शिंदे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यू क्रमांक ७३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. बालिकेच्या मृत्यूमागे अन्य कोणतेही कारण नसल्याचे, तसेच कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादेत नमूद केले आहे.
आई-वडिलांसोबत झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू; फलटणच्या महात्मा फुले चौकातील घटना
by Team Satara Today | published on : 08 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा