खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणाऱ्या ‘सिंडिकेट’ चा पर्दाफाश व्हायला हवा !

पडद्यामागील सूत्रधार शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

by Team Satara Today | published on : 05 September 2025


सातारा : जिल्ह्यात खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळण्याच्या टोळ्यांचा सूळसुळाट वाढला आहे.  त्यामुळे सातारा पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. फलटण ग्रामीण आणि सातारा शहर पोलीस ठाण्यांमधील दोन वेगवेगळ्या घटनांनी  जिल्ह्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यामुळे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून खड्णी उकळणाऱ्या सिंडिकेट चा पर्दाफाश करून या मागचे सूत्रधार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

फलटण येथे काही दिवसांपूर्वी पोलिस तसेच सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालविणाऱ्या एका चालकाच्या गाडीत अग्नीशस्त्र व अमली पदार्थ ठेवून त्याला गुन्ह्यात अडकविण्याचा आले होते.  याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. प्राथमिक चौकशीत तो गंभीर गुन्हा असल्याचे निष्पन्न होताच, फलटण ग्रामीण पोलिसांच्या कसून तपासानंतर हा प्रकार जाणीवपूर्वक रचलेला ट्रॅप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी उलट संबंधित टोळीवरच गुन्हा दाखल करत या कटाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी कट रचणारा मुख्य संशयित फरार असल्याने त्याला अटक झाल्यानंतरच या प्रकरणाचा छडा लागणार आहे.

दरम्यान, सातारा शहरात दोन महिन्यांपूर्वी एका नामांकित डॉक्टरवर अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. एका नामांकित डॉक्टरवरच अशाप्रकारे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे, सातारा शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला एकप्रकारचा बट्टा लागला होता. याप्रकरणी मोठ्या प्रमाणावर मीडिया ट्रायल झाल्यामुळे. जिल्हाभरातील संपूर्ण आरोग्य यंत्रणाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी झाली होती.

असे असतानाच, दोन दिवसांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी तिची आई आणि त्यांना मदत करणारा एक वकील यांनी संगनमत करून या गुन्ह्यातील संशयित आरोपी डॉक्टरकडून तो गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले होते. सबळ पुराव्यांच्या आधारे सातारा शहर पोलिसांनी संबंधित मुलगी, तिची आई व वकिलावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. यानंतर सातारा शहरांमध्ये याप्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत साताऱ्यातील काही वकिलांनी काल दि. ०४ रोजी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेला खंडणीचा गुन्हा हा संशयास्पद असून याबाबत सखोल चौकशीची मागणी केली होती. 

या दोन सलग उघडकीस आलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. निरपराध नागरिकांना खोट्या प्रकरणांत अडकवून आर्थिक फायदा करून घेणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आता पोलिसांनी मोहीम हाती घ्यावी जेणेकरून “गुन्ह्यांची सत्यता तपासल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार ठरविण्यात येऊ नये. अशा पद्धतीच्या कटकारस्थानांविरुद्ध कडक कारवाईची पोलिसांनी करावी,  जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली असून न्याय व्यवस्थेचा गैरवापर करून वैयक्तिक सूड व आर्थिक फायदा घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे हीच पोलिसांसमोर मोठी जबाबदारी आहे. हनीट्रॅप, खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळणे. अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या आहेत. भविष्यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलिसांनी खातरजमा करूनच गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी गुन्ह्यात नाहक गोवलेल्यांकडून होत आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांमधील सिंडिकेटचा पर्दाफाश झाला असला तरी, पोलिसांना पडद्यामागील सूत्रधार अद्याप शोधता आले नाहीत. नेमके यामागील सूत्रधार निष्पन्न झाल्यानंतरच, गुन्ह्यांचे 'मोटिव्ह’समोर येणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गर्भवती महिलेची मुलीसह आत्महत्या

संबंधित बातम्या