अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना मिळणार स्वच्छ, सुसज्ज सुविधा

श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

by Team Satara Today | published on : 22 September 2026


सातारा : स्मशानभूमी म्हटले की अस्वच्छता आणि गैरसोयीचे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीने या पारंपरिक चित्राला छेद देत स्वच्छता आणि सुविधेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून येथे अत्याधुनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण सोमवारी (दि. २१) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राजेंद्र चोरगे, एन. जीवराज परिवाराचे संतोष लुणावत व राजेंद्र लुणावत, नंदकुमार फडतरे, कमला कलाणी, आनंदराव कणसे, नगरसेवक अविनाश कदम व बाळासाहेब खरात यांच्या हस्ते फीत कापून या सुविधेचे उद्घाटन झाले.
प्रसाधनगृहात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, चकाचक टाईल्स, २४ तास पाणी, वॉश बेसिन, विद्युत रोषणाई, ध्वनी यंत्रणा तसेच नियमित स्वच्छता व देखभालीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
या उपक्रमासाठी कविता चोरगे, संतोष व राजेंद्र लुणावत, नंदकुमार फडतरे आणि आनंदराव कणसे यांनी आर्थिक सहकार्य केले. स्वच्छता व देखभालीची जबाबदारी नितीन माने यांनी स्वीकारली आहे.
यावेळी संतोष लुणावत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नगरसेवक अविनाश कदम यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

‘आम्ही केवळ निमित्त; सातारकरांच्या सहकार्याने २३ वर्षांची सेवा’
“कैलास स्मशानभूमीचे काम गेल्या २३ वर्षांपासून सातारकर नागरिकांच्या सहकार्याने अखंड सुरू आहे. प्रसाधनगृह उभारणीच्या या उपक्रमात आम्ही केवळ निमित्त आहोत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे देणगीदार, सहकारी आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा मिळावी, या उद्देशाने हे काम करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार.”
राजेंद्र चोरगे - संस्थापक
बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सांगता; अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी वाजवला ढोल
पुढील बातमी
रयतचा वटवृक्ष ए.आय.च्या युगातही बहरतोय : आंतरराष्ट्रीय ए.आय. तज्ञ डॉ.भूषण केळकर

संबंधित बातम्या