सातारा : किराणा दुकानात उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची घटना दि. 27 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सैदापूर परिसरात घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात रमेश आवळे, त्यांची पत्नी, मुलगा, एका अनोळखी महिलेसह अमर आवळे, किरण आवळे, अतुल आवळे आणि दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या मालकीच्या किराणा मालाच्या दुकानात बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी रमेश आवळे याने उधारीवर सिगारेट मागितली. मात्र, फिर्यादीने उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करत फिर्यादीशी असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर रमेश आवळे यांची पत्नी, मुलगा, एक अनोळखी महिला तसेच अन्य आरोपी व दोन ते तीन अनोळखी लोकांनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी रमेश आवळे व त्याच्या मुलाने फिर्यादीच्या पाठीत, डोक्यात व मानेवर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच रमेश आवळे याने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ केली.दरम्यान, फिर्यादीला सोडविण्यासाठी आलेल्या निनाद भरत सुरगुडे याच्या डाव्या हातावर आरोपीच्या मुलाने स्टीलच्या रॉडने मारहाण करून त्याला जखमी केले. झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र कोठेतरी पडून गहाळ झाले.
या घटनेत फिर्यादी महिला आणि निनाद सुरगुडे हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार यू. बी. माने करीत आहेत.
सैदापूर परिसरात उधारीवर सिगारेट न दिल्याने महिलेचा विनयभंग; मारहाणीत दोघे जखमी
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा