सातारा : शिक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक आणि जीवन कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. या नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी स्वतः अद्ययावत राहून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने आयोजित माध्यमिक शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार, कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे संचालक डॉ. विजयकुमार सावंत, विभागीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सहसचिव बी. एन. पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेला आदर्श शैक्षणिक संकुल बनवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रासाठी सुरू असलेले विविध प्रकल्प भविष्यात राज्यासाठी रोल मॉडेल ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. विजयकुमार सावंत यांनी कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली.
या परिषदेत डॉ. वंदना जाधव-नलावडे यांनी मुख्याध्यापकांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अनुभवाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, प्रभावी अध्यापन पद्धती, जीवन कौशल्ये आणि तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींचा शालेय शिक्षणात समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधून त्यांना देशाचे आदर्श नागरिक म्हणून घडवण्याचे ध्येय प्रत्येक शाळेने ठेवले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी दृकश्राव्य माध्यमातून काळानुरूप पूरक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. शाळेत तंत्रज्ञान, गुणवत्ता वाढ प्रकल्प, उपयुक्त प्रशिक्षण, संवाद कौशल्य आणि आवश्यक समुपदेशन या गोष्टींचा अंतर्भाव असायला हवा, असे सांगून त्यांनी शाळेच्या परिसरातील वातावरण आणि त्याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. सहायक विभागीय अधिकारी नानासाहेब निकम यांनी आभार मानले. या परिषदेसाठी राज्यभरातून रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आणि माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.