स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; जनजागृती करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा प्रणव सावंत यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 14 May 2026


सातारा : सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले असून, शिवसेनेच्या उबाठा गटाने महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यासंदर्भात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी तातडीने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण कक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रणव सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

स्मार्ट मीटर बसवणे हे सर्वसामान्य ग्राहकांवर बंधनकारक नसल्याचा दावा करत सावंत यांनी शासनाच्या अधिसूचना आणि तांत्रिक अटींचा दाखला दिला. ज्या भागात संचार नेटवर्क उपलब्ध नाही, त्या ठिकाणी पूर्वभुगतान मीटर वापरण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साडेसहाशे वोल्टपेक्षा अधिक क्षमतेच्या वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र तांत्रिक नियम लागू करण्यात आले असून, हे नियम केवळ वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी मार्गदर्शक स्वरूपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

“स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांवर सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महावितरणने याबाबत स्पष्ट भूमिका मांडून जनतेचा संभ्रम दूर करावा. कोणत्याही प्रकारे जबरदस्ती सहन केली जाणार नाही,” असा इशारा प्रणव सावंत यांनी दिला.

यावेळी जिल्हा संघटक रविराज पांडुरंग बडदरे, प्रदिजा पवार, अॅड. दीपक साळुंखे, अभिराज देशमुख, विकास हादवे, केतन पाटील, शैलेश बोडके आदी उपस्थित होते.

दरम्यान, महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगावी, अन्यथा “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडून संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरकुल वितरण सोहळ्याच्या निमित्ताने साताऱ्यात भाजपची शक्तिप्रदर्शनाची तयारी; ना. जयकुमार गोरे यांच्याकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी; १५ हजार नागरिकांच्या उपस्थितीचे नियोजन
पुढील बातमी
साताऱ्यात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार; देशभरातील नामांकित मल्ल साताऱ्यात दाखल; छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज

संबंधित बातम्या