सातारा: उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच, आता सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे पडसाद साताऱ्यात उमटले असून, संतप्त समाजबांधवांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर धडक देऊन संबंधित विकृत प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर येथील पुतळ्याच्या विटंबनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओवर एका व्यक्तीने अत्यंत खालच्या भाषेत आणि आक्षेपार्ह कमेंट केली. ही बाब समाजबांधवांच्या निदर्शनास येताच शहरात संतापाची लाट उसळली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अशा कमेंट्समुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आले आणि त्यांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. यावेळी वातावरण काही काळ तापले होते. आक्रमक झालेल्या जमावाने संबंधित कमेंट करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी आक्रमक समाजबांधवांशी संवाद साधला. त्यांनी उपस्थित जनसमुदायाची समजूत काढताना सांगितले की: "कायद्यानुसार कोणालाही महापुरुषांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. ज्याने ही आक्षेपार्ह कमेंट केली आहे, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनानंतर समाजबांधवांनी शांतता राखली. या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. संबंधित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.