सातारा जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढविण्याची भूमिका : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by Team Satara Today | published on : 20 September 2026


बामणोली : आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन महायुती म्हणून लढविली पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दरे (ता. महाबळेश्वर) येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
उपमुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसीय दरे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महायुतीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची गरज व्यक्त केली. 'राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत सरकार गंभीर आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट किंवा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली परिस्थिती असो... संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील,' अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
'मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची आपण पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांची प्रक्रिया पाच ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. शेतकरी संकटात असताना सरकार त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मदत केली जाईल. यापूर्वीही सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली असून, त्याची आकडेवारी जाहीर करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे,' असेही शिंदे यांनी नमूद केले.
राज्यातील विविध विकास प्रकल्प, ‘लाडकी बहीण’ योजनेसह सरकारच्या विविध उपक्रमांची देश-विदेशात चर्चा होत आहे. महाराष्ट्राची अस्मिता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकल महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन नवीन धोरण राबविणार; राज्यात ५४ लाख एकल महिलांची प्राथमिक नोंद
पुढील बातमी
जमिनीच्या वादातून बेदम मारहाण झालेल्या सूरज सूर्यवंशीचा मृत्यू; हेळगाव परिसरात तणावाचे वातावरण

संबंधित बातम्या