सातारा : किराणा दुकानातून साहित्य घेऊन पैसे न देता निघून जाण्याच्या प्रकाराला विरोध केल्याच्या कारणावरून महिलेशी अश्लील वर्तन करून तिची ओढणी ओढली. तसेच दुकानमालकावर कोयत्याने हल्ला करून लाकडी दांडके व दगडाने मारहाण केल्याची घटना दि. 27 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मल्हार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी विनयभंग व दुखापत प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मल्हार पेठेतील एका किराणा स्टोअर्समध्ये असताना आरोपी दुकानातील साहित्य घेऊन त्याचे पैसे न देता निघून जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या वहिनी यांना असभ्य भाषेत बोलून त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधितांनी कोयत्याने, दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून जालिंदर साठे, शुभम साठे, अनिकेत माने (सर्व रा. मल्हार पेठ, सातारा) आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.
साताऱ्यात किराणा दुकानात कोयत्याने हल्ला; महिलेशी अश्लील वर्तन, पैसे न देता साहित्य नेण्यास विरोध केल्याने चौघांचा धुडगूस
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा