हिंद-दी-चादर’च्या जयघोषात नांदेडमध्ये होणार देशव्यापी शहिदी समागम ; देशभरातील नागरिक होणार सहभागी

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा : धर्म, सत्य, सहिष्णुता आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आणि राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक समागम साजरा होणार आहे.

या शहिदी समागमाचा मुख्य सोहळा नांदेड शहरातील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून, देशभरातील शीख समाजासह ९ समाजासह इतर सर्व समाज सहभागी होणार आहेत. विविध समाजघटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मराठवाड्यातील हजारो भाविक या कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. 

श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांसाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. ‘घराघरात आणि मनामनात’ गुरुजींचे विचार रुजविण्यासाठी शासनातर्फे शालेय विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

  या कार्यक्रमाच्या आयोजनात राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत. शिक्षण, सांस्कृतिक, माहिती व जनसंपर्क तसेच सामाजिक न्याय विभाग या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून विविध उपक्रमांना संबोधित करणार आहेत.

 शहिदी समागमानिमित्त प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक प्रदर्शन, डॉक्युमेंटरी शो तसेच वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या त्यागाची गाथा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणार आहे. नांदेडमध्ये होणाऱ्या या ऐतिहासिक देशव्यापी कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या विचारांना अभिवादन करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
पुढील बातमी
ज्ञानार्जनाबरोबर कला, क्रीडा कौशल्य आत्मसात करावीत - सौ. वैशाली क्षीरसागर; नूतन मराठी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

संबंधित बातम्या