जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; २६ हजार कर्मचाऱ्यांना १९८२ ची योजना लागू करण्याची मागणी; मुंबईत आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अथवा अंशतः अनुदानित आस्थापनेवर नियुक्त होऊन त्यानंतर नियमित वेतनश्रेणीसह शंभर टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी साताऱ्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून मूक मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघासह विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात मागण्यांचे फलक घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने काढलेल्या या मोर्चातून शासनाचे लक्ष प्रलंबित पेन्शन प्रश्नाकडे वेधण्यात आले.
राज्यातील सुमारे २६ हजार पेन्शनपीडित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश काढावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
२५ सप्टेंबरपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
त्यानंतर २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याची भूमिकाही निवेदनातून स्पष्ट करण्यात आली.
दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक, कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. तसेच २६ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोर्चात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ, सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना, प्रयोगशाळा महासंघ, ग्रंथपाल संघटना, शिक्षण संस्था संघटना, शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सातारा बंदचे आवाहन; व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
पुढील बातमी
जावळी तालुक्यात शेतीच्या बांधालगत भंगाराचा साठा? प्लॅस्टिक कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

संबंधित बातम्या