पुसेगाव बाजारपेठ कडकडीत बंद, रस्त्याच्या कामाबाबत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, मुख्य बाजारपेठेतूनच महामार्ग रस्ता झाला पाहिजे

by Team Satara Today | published on : 02 September 2026


पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथील प्रस्तावित सातारा लातूर महामार्ग बाह्य वळण रस्ता रद्द करून हा महामार्ग मुख्य बाजारपेठेतूनच जावा, तसेच याच रस्त्याचे रखडलेले सुमारे ७० मीटर लांब आणि १२ मीटर रुंदीच्या हनुमान चौक ते सेवागिरी महाराज मंदिर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. या मागणीसाठी पुसेगाव येथे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलन केले. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी प्रवासी आणि नागरिकांना त्रास सोसावा लागला.
या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील रस्त्याच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा बंद तसेच आंदोलने करण्यात आली. मात्र, अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने यावेळी ग्रामस्थ व व्यापारी आक्रमक झाले होते. संबंधितांच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी नायब तहसीलदार महेश गायकवाड, महसूल विभागाचे मंडलाधिकारी किशोर खटावकर, ग्राम महसूल अधिकारी हिरके यांना येथील निवेदन दिले.
यावेळी ‘मुख्य बाजारपेठेतूनच महामार्ग रस्ता झाला पाहिजे’, अशी ठाम भूमिका मांडत प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. या रस्त्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा निघाला नाही, तर यापुढील काळात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला. यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर आणि तहसीलदार बाई माने यांनी दोन दिवसांत ग्रामपंचायत व श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, रस्त्यालगतचे बाधित नागरिक, ग्रामस्थ व व्यापारी यांची संयुक्त बैठक दोन दिवसांत घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मात्र या बैठकीतून ठोस तोडगा निघाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला आहे. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुसेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी अधिकचा पोलिस फौज मागवून चोख बंदोबस्त ठेवला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशात टोलचा मोठा घोटाळा उघडकीस; संशयास्पद व्यवहार होत असल्याचा संशय, ईडीचे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील टोलनाक्यांवर छापे
पुढील बातमी
सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा, उपोषण सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याची मागणी

संबंधित बातम्या