सातारा : नांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका शेतकर्याच्या 13 गायींचा गेल्या 8 दिवसांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. गायींचे शवविच्छेदन करून रक्तासह अन्य नमुने तपासणीसाठी पुणे व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच गायींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
शेतकरी अजिज महमद शेख यांचा नांदवळ येथे जनावरांचा गोठा आहे. त्यांच्याकडे 29 जनावरे आहेत. दि. 25 जूनपासून अचानक गायींची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्यांनी तत्काळ खासगी पशुवैद्यकीय अधिकार्यांमार्फत गायीवर उपचार सुरू केले. मात्र, 8 दिवसांत 13 गायींचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, पुणे येथील प्रयोगशाळेचे जॉईंट कमिशनर डॉ. हलसुरे, उपायुक्त डॉ. लहाने, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भिसे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकार्यांनी घटनास्थळास भेट दिली.
मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळा व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. संबंधित गोठ्यातील अन्य जनावरांवरही औषधोपचार केले आहेत. गावातील सुमारे 506 जनावरांना दोन पथकामार्फत लसीकरण केले आहे. गावात पशुसंवर्धन विभागाचे पथक तैनात आहे.
पशुपालकांनी घाबरून न जाता पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपल्या जनावरांमध्ये काही लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.