नवी दिल्ली : नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री देशाला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. हे विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही, याबद्दल त्यांनी देशवासीयांकडे खंत व्यक्त केली. या निर्णयामुळे देशातील माता-भगिनी दुःखी असून त्यांच्या या वेदनेत आपणही सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
संसदेत विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले ६६ टक्के बहुमत सरकारला मिळाले नसले तरी, देशातील १०० टक्के नारीशक्तीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महिला कधीही आपला अपमान विसरत नाहीत, असे सांगतानाच त्यांनी महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना त्यांच्या या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल, असा इशारा दिला. महिलांच्या प्रगतीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, विरोधकांच्या या भूमिकेमुळे आमचे मनोधैर्य खचलेले नाही, उलट आमचा निर्धार आता अधिक दृढ झाला आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी संसद आणि विधिमंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक असून, कोणतीही राजकीय शक्ती नारीशक्तीला या अधिकारापासून रोखू शकणार नाही. भाजप आणि एनडीएचा महिला आरक्षणाबाबतचा संकल्प आजही अभंग असून, या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही त्यांनी देशवासीयांना दिली.