साताऱ्यात अंत्योदय कार्डवरील साखरेची खासगी दुकानात विक्री; दुकान संचालिकेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा, २०७ किलो साखर जप्त

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : साखरेच्या वाढत्या दरामुळे साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने व्यापाऱ्यांची व रेशन दुकानांची गोदामे तपासण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि. २५) साताऱ्यातील २० दुकानांची तपासणी केली. यात राधिका रस्ता येथील स्वामी समर्थ किराणा अँड जनरल स्टोअर्स, सातारा येथून अंत्योदय कार्डवर दिली जाणारी २०७ किलो रेशनिंगची साखर जप्त करून दुकान संचालिकेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपासणीची मोहीम २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

साखरेचे दर वाढल्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने साखरेच्या साठ्यावर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने साखर व्यापाऱ्यांची गोदामे आणि दुकानांना भेटी देऊन साठ्याची पाहणी केली. यामध्ये राधिका रस्त्यावरील स्वामी समर्थ किराणा अँड जनरल स्टोअर्स, सातारा येथे पुरवठा पाहणी अधिकारी बालाजी धावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी अंत्योदय लाभार्थ्यांसाठी राखीव असलेली ५० किलोची चार पांढरी पोती आढळून आली.

त्यामध्ये एकूण २०७ किलो रेशनिंगची अंदाजे १० हजार ९९० रुपये किमतीची साखर बेकायदेशीररीत्या साठवून विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. या साठ्याबाबत वैध परवाना, खरेदी बिल किंवा शासकीय साठवणुकीचा पुरावा सादर करता न आल्याने पुरवठा विभागाने साखर जप्त करून शासकीय गोदामात जमा केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड तालुक्यातील सुपने आरोग्य केंद्रात साप घुसल्याने रुग्णांची धावपळ; स्थानिक तरुणांनी सापाला सुरक्षितपणे पकडल्याने धोका टळला
पुढील बातमी
एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक

संबंधित बातम्या