सातारा : ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर आज सोमवारी एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली. किल्ल्याच्या कड्यावरून सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना समजताच 'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमने जिवाची बाजी लावत रेस्क्यू ऑपरेशन राबवले, मात्र दुर्दैवाने त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले नाहीत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार दि. २ रोजी एक व्यक्ती अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावर असताना अचानक पाय घसरून थेट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. तातडीने साताऱ्यातील दुर्गप्रेमी आणि 'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमला पाचारण करण्यात आले.
कॉल मिळताच ट्रेकर्सची टीम आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर पोहचली. दरीची खोली आणि दुर्गम ठिकाण यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. मात्र, कसलेही भय न बाळगता ट्रेकर्सचे पथक दोरखंडाच्या साहाय्याने खोल दरीत उतरले. संबंधित व्यक्ती अत्यंत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत सापडली.
रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
ट्रेकर्सनी मोठ्या शिताफीने त्या व्यक्तीला दरीतून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.