सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी निकोप समाजनिर्मितीसाठी आयुष्य खर्ची घातले. त्यांनी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरांकडे विवेकी, चिकित्सक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला. विज्ञानाच्या कसोटीवर तपासून कोणताही विचार स्वीकारा, असे ते नम्रपणाने सांगत राहिले. समाजासाठी समर्पित आयुष्य जगणाऱ्या, समाजासाठीच आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या समाजसुधारकाचे विचार जपणे आणि पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा सातारा व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शाहूपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतिशेष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या पंधरा पुस्तिकांचे प्रकाशन विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर, माजी प्राचार्या प्रमोदिनी मंडपे, सामाजिक कार्यकर्ते उदय चव्हाण, कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. गजानन भोसले, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सर्जेराव पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. जयश्री आफळे, मराठी विभागप्रमुख डॉ. आबासाहेब उमाप, डॉ. जयश्री बाबर, प्रा. निरंजन फरांदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार समजून घेण्यास आपला समाज कमी पडला. पुढच्या पिढीने ही चूक करता कामा नये. दाभोलकरांचे कार्य कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हते. ती तर धर्म सुधारण्याची आणि समाजाला अधिक प्रगल्भ बनवण्याची धडपड होती. डॉ. प्रसन्न दाभोलकर म्हणाले, माणसाने डोळसपणे विचार करावा, परंपरा आहे म्हणून अथवा आंधळेपणाने कोणताही विचार स्वीकारू नये. सत्याच्या कसोटीवर तो तपासून घ्यावा. जे सत्य असेल तेच स्वीकारावे. माणूस विचारी प्राणी आहे. परंतु तो जेव्हा विचार करायचे सोडून देतो तेव्हा समाजाचे मोठे नुकसान होते. डॉ. दाभोलकरांचे विचार आपण वाचा, त्यावर विचार करा, तर्काच्या कसोटीवर तपासा, मग निर्णय घ्या.
प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांनी प्रकाशित झालेल्या पंधरा पुस्तिकांचा परिचय करून दिला. विद्यार्थिनींनी वैचारिक प्रगल्भतेसाठी वाचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मेनकुदळे यांनी भारतातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचे परिशिलन केले. महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या सुधारकांनी समाजाला दिलेल्या नव्या दृष्टीची व मानवतावादी विचारांची कास आपण धरली पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी निस्वार्थ भावनेने पूर्णवेळ काम करून विज्ञानवादाचा प्रसार आणि प्रचार केला. भारतीय राज्यघटनेने सांगितलेली मूल्य समाजात रुजविण्यासाठी ते झटले. सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव ही मूल्येच आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवू शकतात, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेने नेहमीच पुरोगामी विचारधारेचा पुरस्कार केला असून पुढेही तो होत राहील, असा विश्वास त्यांनी दिला.
कार्यक्रमास प्रा. दत्ताजीराव जाधव, ॲड. हौसेराव धुमाळ, प्रशांत पोतदार, प्रकाश खटावकर, भगवान रणदिवे,डॉ. दीपक माने, वंदना माने, जयप्रकाश जाधव, विजय पवार इ. कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय उदय चव्हाण यांनी करून दिला. आभार डॉ. आबासाहेब उमाप यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. निरंजन फरांदे व डॉ. जयश्री बाबर यांनी केले.