लॉकरवर विसरलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने केले प्रामाणिकपणे परत; जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेचे सर्वत्र कौतुक

by Team Satara Today | published on : 23 August 2026


सातारा : “पैशांपेक्षा विश्वासाची किंमत मोठी असते आणि तो विश्वास जपणे हीच खरी बँकिंग सेवा आहे,” याचा प्रत्यय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून दिला. लॉकरवर विसरलेली सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीच्या वस्तू कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे संबंधित खातेदाराकडे परत करून कर्मचाऱ्यांनी बँकेच्या विश्वासार्हतेला आणखी एक नवी उंची दिली.

जिल्हा परिषद शाखेत कार्यरत सौ. सुजाता महेंद्र तुपे या नेहमीप्रमाणे लॉकरचा कप्पा उघडण्यासाठी शाखेत आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घाईगडबडीत लॉकरवर ठेवलेली दागिन्यांची पिशवी घेण्यास विसरल्या. दुपारी कामानिमित्त शाखेचे सेवक श्री. अनिल पवार लॉकरजवळ गेले असता त्यांना लॉकरवर एक पिशवी आढळली.

पिशवी तातडीने सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांनी शाखाप्रमुख श्री. विवेक मोरे व कॅशियर सौ. रुपाली लावंड यांना याची माहिती दिली. पिशवीच्या बाहेरून तिच्यातील वस्तूंची माहिती मिळत नसल्याने, संपूर्ण पारदर्शकता राखत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पिशवी उघडण्यात आली. त्यातील कापडी पिशवीवर असलेल्या नावावरून ती सौ. सुजाता तुपे यांची असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर शाखाप्रमुख श्री. विवेक मोरे यांनी सौ. तुपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाखेत बोलावून घेतले. श्री. अक्षय बोबडे, सौ. सुप्रिया देशमुख व कु. प्रज्ञा आगुंडे यांच्या उपस्थितीत पिशवी उघडण्यात आली. त्यामध्ये सौ. तुपे यांनी सांगितलेले सोन्याचे दागिने तसेच पती व मुलांच्या चांदीच्या वस्तू जशाच्या तशा असल्याचे आढळले. लाखो रुपयांचे दागिने सुरक्षित आणि प्रामाणिकपणे परत मिळाल्याने सौ. तुपे यांना सुखद धक्काच बसला. त्यांनी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“विश्वास जपणारे कर्मचारी हीच जिल्हा बँकेची खरी ताकद!”

या घटनेचे कौतुक करताना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र सरकाळे म्हणाले, “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची विश्वासार्हता ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ग्राहकांचा पैसा आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहेच; मात्र एखाद्याची विसरलेली संपत्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे परत करणे, ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या संस्कारांची आणि मूल्यनिष्ठ सेवेची ओळख आहे. जिल्हा बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या प्रामाणिकपणातून बँकेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ केला आहे.”

राजू भैय्या भोसले यांच्याकडून कौतुक 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. राजू भैय्या भोसले यांनी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत, “आजच्या काळात लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू कोणतीही अपेक्षा न ठेवता परत करणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे समाजात विश्वास आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होते,” असे गौरवोद्गार काढले.

जिल्हा परिषद सदस्य श्री. अजित साळुंखे यांनीही शाखेतील सेवकांच्या तत्पर, विनम्र व प्रामाणिक सेवेचे कौतुक केले. त्यांनी श्री. अनिल पवार यांच्यासह शाखेतील सर्व सेवकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला दाद दिली.

प्रामाणिकपणाची ही परंपरा नवी नाही ! 

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची ही पहिलीच घटना नसून, सन २०२० मध्ये परळी शाखेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असताना श्री. विवेक मोरे यांनी एटीएम कार्डच्या आधारे एका आरोग्य सेवकाचा संपर्क शोधून त्याचे रोख रकमेसह हरवलेले पाकीट परत केले होते. सातारच्या मातीशी असलेली नाळ, ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि विनम्र, तत्पर व विश्वासार्ह सेवा यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून ‘विश्वास हीच खरी कमाई’ हा संदेश दिला आहे. या प्रामाणिकपणाबद्दल जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे तसेच अधिकारीवर्गाने जिल्हा परिषद शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या घटनेचे जिल्हा परिषदेसह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

संबंधित बातम्या