ओगलेवाडीत तिघांकडे सापडली दोन पिस्तुले

by Team Satara Today | published on : 10 June 2025


कराड : ओगलेवाडी (ता. कराड) परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या तिघा संशयितांना पकडण्यात सातारा गुन्हे अन्वेषण विभागास यश आले आहे. संशयितांकडून दोन पिस्तूल, पाच मॅक्झिनसह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तन्वीर अली पटेल ( वय 32, रा. वाघेरी, ता. कराड), ओंकार रामचंद्र साळुंखे ( वय 21, रा. ओगलेवाडी) व जिशान समशुद्दीन मुलानी (वय 27, रा. हजारमा) अशी संशयितांची नावे आहेत. ओगलेवाडी परिसरात तन्वीर पटेल, ओंकार साळुंखे आणि जिशान मुलाणी हे तिघे देशी बनावटीची पिस्टले घेऊन वावरत असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी दुपारी ओगलेवाडी येथे सापळा रचला. त्यावेळी तन्वीर पटेल, ओंकार साळुंखे व जिशान मुलाणी हे तिघे संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता तिघांकडे दोन देशी बनावटीची पिस्टले, पाच मॅक्झिन व तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला. घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, या प्रकरणी तिघा संशयितांच्या साथीदारांकडे चौकशी सुरू होती. त्यामुळे संशयितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सरकारी जागेतील अतिक्रमण प्रकरणी सरपंच, उपसरपंच अपात्र
पुढील बातमी
रक्‍तदान करून बकरी ईद साजरी

संबंधित बातम्या