सातारा : लेखक हा जीवनाचा शोध घेत असतो. तो सुखाची कमी आणि दुःखाची कहाणी जास्त लिहितो. दुःखाच्या अनेक छटा असतात. त्या लेखकाला मांडता आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी रियाज महत्त्वाचा आहे, असे मत 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
अनावळे (ता. सातारा) येथे श्रीलीला रिसॉर्ट मध्ये दोन दिवस चाललेल्या या संमेलनात कथाकथन, महिला कविसंमेलन, गझल मुशायरा, नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण, कथाकथन, बोलीभाषा कविसंमेलन, बालसाहित्य सादरीकरण अशी दर्जेदार सत्रांनी साहित्य संमेलन रंगतदार ठरले. रविवारी या संमेलनाचे सूप वाजले.
पनवेलच्या सर्जनशील चौथ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध लेखक बाळासाहेब लबडे, कार्याध्यक्ष श्रीपती माने, स्वागताध्यक्ष प्रितम माने निमंत्रक प्रवीण बोपुलकर, पुष्पराज गावंडे, प्रतिभाताई सराफ, प्रमोद काकडे, अंजलीताई ढमाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, लेखकाने जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या अनुभवाने लेखन केले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अंधानुकरण लेखकाने करू नये अन्यथा हौशी लेखक हा शेवटपर्यंत हौशीच राहतो. लेखकाने स्वयंप्रकाशित होऊन स्वतःची वाट ओळखावी. ज्याप्रमाणे गायकाला रियाज्याची गरज असते, त्याचप्रमाणे लेखकालाही रियाज आवश्यक आहे. समाजाचे वाचन करताना पाहिजे. वृत्तपत्राचे नियमित वचन केल्याने अनेक घटना- घडामोडी समजतात. त्यातूनच नवनिर्मितीची प्रेरणा लेखकाला मिळू शकते. नवोदित लेखकांसाठी मोबाईल वरील समाज माध्यमे हे वरदान आहे. रील किंवा तत्सम गोष्टी न बघता युट्युब आणि विकिपीडिया याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. हे नव माध्यम हाताळण्याची कला शिकण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच आपला अनुभव समृद्ध करता येतो.
पुष्पराज गावंडे म्हणाले, साहित्य नेहमी सृजनशील असते आणि लेखकाची भूमिका ही निरीक्षकाची असते. लेखकाने सतत चिकित्सक असले पाहिजे. त्याचं मन संवेदनशील असावं. त्यावरच त्याच्या लिखाणाचा पोत अवलंबून असतो. एखाद्या प्रसंगाने आनंद किंवा वेदना झाल्या तर त्यातून साहित्याचे प्रतिबिंब कागदावर उमटते.
अंजलीताई ढमाळ म्हणाल्या, प्रत्येक माणसाला त्याच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. या भावनांना शब्दरूप देण्याचे काम साहित्यिक करत असतो आज भाषा टिकवण्याचं आव्हान सर्वांपुढे आहे. बाळासाहेब लबडे यांनी आपल्या भाषणात लेखकाने आपल्या अनुभवांना कलेचे रूप दिले तर दर्जेदार साहित्याची निर्मिती घडते असे मत व्यक्त केले.
प्रारंभी प्रस्ताविकात संमेलनाचे निमंत्रक आणि सर्जनशील शब्दवेल साहित्य साहित्य संघाचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितली. शब्दवेलच्या दिवाळी अंकाला 24 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी बोली भाषा विशेषांक काढण्यात आला, त्यालाही तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कांतामाई भोसले यांच्या स्वागत गीताने संमेलनाला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अभंग सादर केला. यावेळी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या सातारा विभागाच्या अध्यक्ष अश्विनी कोठावळे, संघाचे प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले, नवनाथ माने,प्रवीण सोनोने, प्रीतम माने, आबासाहेब कडू, देवेंद्र इंगळकर, रामदास गायधने, मनीषा शिरटावले तसेच राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने आलेले साहित्यिक उपस्थित होते.
क्षणचित्रे
*शब्दवेल ही सांस्कृतिक चळवळ आहे यात युवा पिढीचा अधिक सहभाग हे आशादायक चित्र आहे अशा शब्दात लक्ष्मीकांत देशमुख यांनी शब्दवेल साहित्य संमेलनाचा गौरव केला.
*यावेळी सर्जनशील साहित्य संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
*सर्जनशील शब्दवेध साहित्य संघाचे पुढील साहित्य संमेलन संतनगरी शेगाव येथे होणार असल्याचे प्रवीण बोपुलकर यांनी जाहीर केले.