निष्ठावंत व कडवट शिवसैनिक बाळासाहेब शिंदे सातारा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार

by Team Satara Today | published on : 22 October 2025


सातारा :  नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची सोडत होऊन सदरचे पद हे सर्वसाधारण झाले असून आता अनेक दिग्गज आपले नशीब आजमावणार आहेत. या सर्वांच्या शर्यतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री बाळासाहेब शिंदे हे  नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. 

गेली 40 वर्ष एकच पक्ष, एकच झेंडा, एकच नेता आणि कट्टर निष्ठावंत अशी ओळख सातारा शहरात बाळासाहेब शिंदे यांची आहे. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन शालेय जीवनापासूनच ते शिवसेनेशी जोडले गेले. शाखाप्रमुख, उपशहर प्रमुख ,शहर प्रमुख, तालुका संघटक अशी विविध पदे भोगत त्यांनी त्यास न्याय देण्याचे काम केले. सातारा शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांना ओळखला जाणारा वर्ग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा कट्टर ,निष्ठावंत व कडवट शिवसैनिक म्हणून सातारा शहरात त्यांची ओळख आहे. 

20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या तत्त्वास अनुसरून पक्षीय मतभेद बाजूला सारत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. सातारा नगरपालिकेची तीन वेळा नगरसेवक पदासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, बलाढ्य व धनाड्य शक्तीपुढे त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण जनतेच्या मनात मात्र त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक कार्य करीत असताना आठ वर्षांपूर्वी त्यांनी शिवप्रेरणा प्रतिष्ठानची स्थापना 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी स्थापन केली. आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. 

दरवर्षी 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका शाळेतील गरीब होतकरू व हुशार मुलींना सायकल वाटप, अपंग व निराधार लोकांना चादर, ब्लॅंकेट वाटप ,शाहू बोर्डिंग मधील मुलांना मिष्टान्न वाटप , सिव्हिल हॉस्पिटल, आर्याग्ल रुग्णालय , एहसास गतिमंद आणि रिमांड होम मधील मुलांना अन्नदान तसेच प्रतिवर्षी 27 जुलै रोजी पक्षप्रमुख ,माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप गणवेश वह्या दप्तर यांचे वाटप दरवर्षी केले जाते ,शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत 25000 वह्या 1000 दप्तरे 400 गणवेश आणि 70 सायकलीचे वाटप केले आहे.कोरोना काळात देखील अनेक नागरिकांना धान्याचे किट, मास्क वाटप, औषध उपचार इत्यादी मदत शिवप्रेरणा प्रतिष्ठान तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करण्यात अली. त्याचप्रमाणे कोव्हीड योध्यांचा सन्मान त्याकाळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक जनआंदोलन केली. पाण्याचा प्रश्न असो, लाईट,रस्ते किंवा अनेक नागरी अडचणी संदर्भात केलेल्या आंदोलनात आजही त्यांच्यावर  केसेस दाखल आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना स्वच्छ प्रतिमा, सक्षम नेतृत्व ,धडाडीचा कार्यकर्ता, गोरगरिबांचा रक्षक, निष्ठावंत व कडवट शिवसैनिक आणि योग्यवेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा कितीही अमिषे व प्रलोभने दाखवली तरी त्यास बळी न पडता निश्चित मनाने फक्त आणि फक्त बाळासाहेब शिंदे यांनाच मतदान करेल, या तिळमात्र शंका नाही, असा त्यांचा विश्वास आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात रंगणार महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा भव्य उत्सव ; 'फोक प्रबोधन' येतंय साताऱ्यात
पुढील बातमी
सातारा पोलिसांची दिवाळी हक्काच्या घरात साजरी; 698 घरांचे सोडत पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप, पोलीस अधिकाऱ्यांसाठी 24 सदनिका

संबंधित बातम्या