उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशातच मंगळवारी उत्तरकाशीमध्ये ढगफुटी प्रलय आलाय. उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झाली. धराली येथील खीर गडच्या पुरात अनेक घरे वाहून गेली असून बचाव कार्य सुरू आहे. ढगफुटीनंतर पाण्याचा मोठा प्रवाह धराली गावातील बाजारपेठेत आला ज्यामुळे मोठा हाहाकार उडाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहात डझनभर घरे वाहून गेली आहेत. स्थानिक प्रशासन बचावकार्यासाठी रवाना झाले आहे. ही घटना बारकोटजवळ घडली. ढगफुटीमुळे डोंगराचा मोठा भाग पाण्यासह खाली आणि गावात घुसला. धराली खीर गड येथे पाण्याची पातळी वाढल्याने धराली बाजाराच मोठं नुकसान झालं. गंगोत्री धामचा मुख्य थांबा असलेल्या धराली येथील खीर गड नदीत ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले. विनाशकारी पुरामुळे सुमारे २० हॉटेल्स आणि होमस्टेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक स्थानिक लोक आणि कामगार गाडले गेल्याची शक्यता आहे.
"उत्तरकाशीमध्ये, हरसिल परिसरातील खीर गडच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि धरालीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे पोलिस, एसडीआरएफ, सैन्य आणि इतर आपत्ती प्रतिसाद पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने नदीपासून योग्य अंतर राखले पाहिजे. स्वतःला, मुलांना आणि गुरांना नदीपासून योग्य अंतरावर घेऊन जा," अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिली.
पाण्याचा प्रवाह पाहून दूर असलेल लोक ओरडत होते. पाण्याचा मोठा प्रवाह गावाकडे येताच लोक ओरडू लागले. अनेक हॉटेलमध्ये पाणी आणि मातीचे ढिगारा शिरला. धाराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक हॉटेलची दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या २ दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे.