दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान दहीवडी येथील मतदान केंद्रावर एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक निरीक्षक असल्याचे सांगत बनावट ओळखपत्राच्या आधारे रुबाब मिरवणाऱ्या एका तोतया महिलेला दहीवडी पोलिसांनी सतर्कतेने ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. याप्रकरणी वैशाली अक्षदा देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) या महिलेवर दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी माण तालुक्यातील दहीवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होती. संवेदनशील वातावरणामुळे या केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, एक महिला गळ्यात निवडणूक आयोगाचे ओळखपत्र अडकवून स्वतःला ‘निवडणूक निरीक्षक’ असल्याचे भासवत केंद्रात वावरत होती.
मात्र, तिच्या संशयास्पद हालचाली मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि अंमलदारांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ तिची अडवणूक करून कसून चौकशी केली. त्यावेळी बँक निवडणुकीत अशा नावाच्या कोणत्याही निवडणूक निरीक्षकाची अधिकृत नेमणूक झालेली नसल्याची बाब समोर आली.
पोलिसांनी तिच्याकडील ओळखपत्राची बारकाईने पडताळणी केली असता, ते ओळखपत्र सन २०२३ मधील पुणे येथील शिवाजीनगर परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचे असल्याचे उघड झाले. कोणतीही अधिकृत नेमणूक नसताना जुन्या ओळखपत्राच्या जोरावर मतदान केंद्रात घुसून तोतयागिरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कायदेशीर बडगा उचलला.
याप्रकरणी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार अजय रामचंद्र झुंजार (नेमणूक: पाटण पोलीस ठाणे) यांनी दहीवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित तोतया महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास दहीवडी पोलीस करत आहेत.
बोगस महिला निवडणूक निरीक्षकाला दहिवडी पोलिसांनी केले गजाआड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान खळबळजनक प्रकार उघडकीस
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा