वाईत सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा धुडगूस; सात जणांवर गुन्हे

गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रस्त्यासह स्मशानभूमी परिसरात पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 28 October 2026


वाई : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या मद्यपींविरोधात वाई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रस्ता आणि विविध ठिकाणच्या स्मशानभूमी परिसरात छापे टाकून पोलिसांनी सात जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाई शहरातील काही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे आणि नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी २५ ऑक्टोबर रोजी विशेष पथके तयार करून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी रवाना केली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रस्ता तसेच विविध स्मशानभूमी परिसरात छापे टाकले. या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०५/२०२६, ३०६/२०२६ आणि ३०८/२०२६ ते ३१२/२०२६ असे एकूण सात गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नका!
वाई पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व धूम्रपान न करण्याचे, तसेच मद्यपान करून वाहन न चालविण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेसाठी शेंद्रेत महायुतीचे शक्तिप्रदर्शन; सहकाराच्या सत्तेवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांची एकजूट
पुढील बातमी
नवोदित धावपटू अभिलाषा वाघमारे हिला नंदा जाधव स्मृती पुरस्कार प्रदान; स्मृतिदिनी १४० जणांचे रक्तदान; क्रीडा संकुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार

संबंधित बातम्या