सातारा : आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर देशात एक वेगळे नाव कमावलेल्या व आमच्या लाडक्या स्वर्गीय मित्र अरुण रावांनी भाऊकाका गोडबोले यांच्या कार्याचा विस्तार केला. वडिलांनी सामाजिक जीवनाची घालून दिलेली परंपरा पुढे चालवत ट्रस्टमध्ये स्वतः निधी घालून तसेच स्वतःच्या भावांना यात सामावून घेत ही परंपरा पुढे नेली. आज तीन पिढ्यांच्या कार्यकर्तृत्वातून या ट्रस्टने कोट्यावधी रुपयाचा निधी उभा केला, परंतु आपण समाजाचे देणे लागतो या उच्च आणि उदात्त हेतूने उभारलेला हा ट्रस्ट आपल्या कार्याने वृद्धिंगतच होत आहे .आज जीवनात आपणही स्वतःचे उद्दिष्ट ध्येय आणि संकल्प स्वप्न पूर्ण करताना आपणही समाजाची जबाबदारी ओळखून नव्या पिढीने जीवन जगले पाहिजे गोडबोले परिवाराने सुरू ठेवलेला हा दानाचा संकल्प हा कायमस्वरूपी आणि इतर लोकांना खरोखरच आदर्श असा आहे. आज आपल्यात स्वर्गीय अरुणराव नसले तरी त्यांच्या मैत्रीतून आमचे ऋणानुबंध जोडले गेले आणि ही मदत आपणाला मिळाली ती लक्षात ठेवून त्याचा योग्य विनिमय करून आपणही असेच एखाद्याला ज्ञान द्यावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी केले.
सातारा येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात समर्थ सदन सातारा येथे संपन्न झालेल्या सोहळ्या माध्यमिक शालेय स्तरातील इयत्ता नववी ते बारावी आणि विविध शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थांना या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ निवृत्त प्राचार्य पुरुषोत्तम शेठ , रजनी क्लासेस चे प्राध्यापक विश्रांत कदम, भाजपचे अधिकारी किशोर गोडबोले, ज्येष्ठ उद्योजक व व्यावसायिक कन्हैयालाल देवी, ज्येष्ठ व्यावसायिक नंदकिशोर नावंधर तसेच गोडबोले ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडबोले यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले यांनी करताना, भाऊकाकांनी सुरू केलेल्या या ट्रस्टचा आज विस्तार मोठ्या प्रमाणात झाला अनेक मुला-मुलींना या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दरवर्षी होणारी मदत ही परिवाराचाआनंद द्विगुणित करणारी आहे .
भाऊ काका नंतर आज तीन पिढ्या या उपक्रमात मोठ्या हिरिरीने सहभागी झाल्या इतर कोणाचीही मदत न घेता स्वकमाईतून हा निधी आम्ही उभारत असून त्यातून ट्रस्टच्याद्वारे शैक्षणिक शिष्यवृत्ती मान्यवरांची व्याख्याने, सांगितिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम ट्रस्ट राबवत आहे, याचा आनंद वाटतो .आपण सर्व सातारा जिल्ह्यातील नागरिक आमच्या परिवारावर करत असलेल्या प्रेमातूनच हा उपक्रम वृद्धिंगत होत आहे याचा आनंद वाटत असल्याचे सांगितले .यावर्षी ट्रस्टच्या वतीने इयत्ता पहिली ते बारावी चे एकूण चारशे जण व विविध संस्था यांना मिळून सुमारे चार लाखाचा निधी शिष्यवृत्ती स्वरूपात वितरित केला असल्याची माहिती देण्यात आली .
यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी प्रा. विश्रांत कदम, किशोर गोडबोले यांनीही ट्रस्टला मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले .याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले ,अशोक गोडबोले,उदयन गोडबोले, डॉ.चैतन्य गोडबोले ,प्रद्युम्न गोडबोले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .