सातारा : मैदानात उतरल्यानंतर विजयापेक्षा सातत्य, शिस्त आणि मेहनतीला अधिक महत्त्व असते. कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि सरावाच्या बळावर जिल्ह्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली ओळख निर्माण करावी. खेळामुळे शरीरासोबतच आत्मविश्वास आणि मानसिक ताकदही वाढते. त्यामुळे शिक्षणाइतकेच क्रीडेलाही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ चा प्रारंभ शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, सातारा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे ३५० कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या फ्रीस्टाईल, १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या फ्रीस्टाईल, तसेच १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीकोरोमन प्रकारातील लढती रंगणार आहेत. येथून विजयी होणाऱ्या मल्लांची कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मुख्याध्यापक संतोष मोरे, आर. वाय. जाधव, महाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, जयदीप गायकवाड, नितीन राजगे, पंचायत समिती सभापती महेश गाडे, बाजार समिती सभापती विक्रम पवार, अमर मोरे, विजय पोतेकर, अरुण कापसे, दादासाहेब शेळके, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदी उपस्थित होते.
८० विजेत्या मल्लांना किट
कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेतील ८० विजेत्या खेळाडूंना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने ट्रॅकसूट किट देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातूनही दर्जेदार मल्ल तयार व्हावेत आणि विद्यार्थ्यांना कुस्तीच्या खेळाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे.
आखाड्यातील घामातून आंतरराष्ट्रीय मल्ल घडावेत
शिवेंद्रसिंहराजे भोसले; साताऱ्यात शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा