सातारा : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर ठाणे येथे पोलीस उपायुक्त असणारे सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर यांची वर्णी लागली आहे. आज दि. 13 रोजी गृह विभागाने शासन आदेश काढून बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली येथून सेवा बजावलेल्या समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली होती. येत्या 19 ऑक्टोबर रोजी समीर शेख यांना सातारा पोलीस अधीक्षकपदाची दोन वर्षे पूर्ण होणारच होती. परंतू त्याअगोदरच गृह विभागाने त्यांची बदली मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली आहे.
समीर शेख यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जिल्ह्यामध्ये अभिनव असे उपक्रम राबवले. यामध्ये उंच भरारी योजना ही राज्यासाठी पथदर्शी ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांचे पुनर्वसन करुन त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या उत्कृष्ठ कामाचे कौतुक करण्यात आले. गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असताना नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे आजच याबाबतची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. समीर शेख यांनी सातारा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर प्रतापगड येथील अफझल खानाच्या कबरीलगतचे अतीक्रमण जमीनदोस्त करणे, पुसेसावळी येथील जातीय दंगल आदी घटना त्यांनी कौशल्याने हाताळल्या. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. जिल्ह्यातील अनेक नामचीन गुन्हेगारांवर मोक्का तसेच तडीपारीच्या कारवाया करुन सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया रोखण्याचे यशस्वी काम त्यांनी पार पाडले.
डॉक्टर सुधाकर पठारे यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे. ते ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ क्रमांक चार येथून बदली होऊन आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या 17 महिन्याच्या कालावधीत त्यांनी आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पठारे यांचे कार्य उल्लेखनीय ठरणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची सातार्यातून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वैशाली कडुकर यांची सातार्यात बदली करण्यात आली आहे. आंचल दलाल या सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या पत्नी होत. त्यांची अवघ्या सहा महिन्यांमध्येच बदली करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या गृह मंत्रालय विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 17 वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या जाहीर केल्या. त्यानुसार सातारा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली; सुधाकर पठारे सातारचे नूतन पोलीस अधीक्षक
अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचीही बदली, त्यांच्या जागेवर वैशाली कडूकर यांची वर्णी
by Team Satara Today | published on : 13 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा