केंद्र सरकार LIC मधील मोठा हिस्सा विकणार! ३१,००० कोटी उभारण्याची तयारी; घोषणेनंतर एलआयसीचा शेअर बाजारात ७ टक्क्यांनी आपटला

by Team Satara Today | published on : 04 August 2026


दिल्ली :  देशातील सर्वात मोठी विमा कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (LIC) मधील आपला हिस्सा कमी करण्यासाठी सरकारने ‘ऑफर फॉर सेल’ प्रक्रिया (OFS) सुरू केली आहे. या निर्णयानंतर मंगळवारी( ४ ऑगस्ट २०२६) कंपनीचा शेअर आपटला. सकाळच्या सत्रात एलआयसीचा शेअर ७ टक्क्यांच्या घसरणीसह ३९८.५ रुपयांवर व्यवहार करत होता. ‘निफ्टी ५०’ मध्ये ६ टक्क्यांची घसरण झाली असताना, २०२६ मध्ये आतापर्यंत एलआयसीच्या शेअरमध्ये ६.५ टक्क्यांची घट झाली आहे. 

एलआयसी विक्रीसाठी ऑफर फॉर सेल (ओएफएस) प्रक्रिया आजपासून (४ ऑगस्ट) खुली होत आहे. या भागविक्रीच्या माध्यमातून सरकार एलआयसीमधील तब्बल ६.५ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा भांडवली बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ३८२ रुपये प्रति समभाग असा फ्लोर प्राईज (किमान मूल्य) निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून सरकारी तिजोरीत मोठा महसूल जमा होण्याची आणि विमा क्षेत्रातील सरकारी गुंतवणूक टप्प्याटप्प्याने कमी करण्याची योजना आखली गेली आहे.

एलआयसीमधील हिस्साविक्रीचा रचना कशी आहे?

या ऑफर फॉर सेलची रचना दोन भागांमध्ये करण्यात आली असून यामध्ये २.५ टक्के मूळ समभाग विक्रीचा समावेश आहे. तसेच भागविक्रीला गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाल्यास अतिरिक्त ४ टक्के समभाग विक्रीसाठी ‘ग्रीन शू ऑप्शन’चा वापर केला जाईल, अशी माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यामुळे एकूण हिस्सा विक्री ६.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे.

भागविक्रीच्या वेळापत्रकानुसार, आज म्हणजेच मंगळवारी (४ ऑगस्ट) ही विंडो केवळ संस्थात्मक (बिगर-किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर उद्या, म्हणजेच बुधवारी (५ ऑगस्ट) सर्वसामान्य किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांना या भागविक्रीत बोली लावता येणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि भांडवली बाजारात महामंडळाची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करता, ही समभाग विक्री सेबीच्या किमान सार्वजनिक समभाग धारणा नियमांचे टप्प्याटप्प्याने पालन करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दीपमचे सचिव अरुणीश चावला यांनी स्पष्ट केले आहे की, निर्धारित वेळेआधीच सेबीच्या नियमांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने ही भागविक्री एक मोठे पाऊल ठरणार आहे. एलआयसीच्या या भागविक्रीमुळे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना आकर्षक दरात समभाग खरेदी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विविध समाज घटकांनी केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यास नवीन बैलजोडी मिळाली; केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाज माध्यमावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद
पुढील बातमी
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल; 'दीपके पाकिस्तानी एजंट, त्याला लगेच अटक करा'

संबंधित बातम्या