कुटूंबाची फसवणूक करत तारण कर्जातील दहा तोळे सोने हडपले; विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीच्या प्रमुखासह तिघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा  :  सोनेतारण कर्जापोटी घेतलेले दहा तोळ्याचे दागिने परत न करता सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मलकापुरातील विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख प्रजापती उर्फ पंकज शुक्ला, एरिया मॅनेजर महेश कदम व जयदीप पंडित थोरात (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेणोली स्टेशन येथील रमेश सावंत यांचा मुलगा रोहित याच्या नावावर जनकल्याण पतसंस्थेत सोनेतारण कर्ज होते. यादरम्यान मित्र जयदीप थोरात याने रोहितला पतसंस्थेतून सोने काढून ते मलकापुरातील विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीत ठेवण्यास सांगितले. त्याठिकाणी दहा तोळे सोन्यावर जादा कर्ज देण्याचे तसेच एक टक्का व्याज कमी लावण्याचे आश्वासन दिले. जयदीप थोरात याच्या सांगण्यानुसार रोहितने 23 फेब्रुवारी 2024 रोजी विघ्नहर्ता कंपनीत दहा तोळे सोने गहाण ठेवून 3 लाख 5 हजार रुपये कर्ज घेतले. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये रोहित व त्याची आई विघ्नहर्ता कंपनीमध्ये दागिने सोडविण्यासाठी गेले असता कंपनीचा गाळा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी गाळामालक नितेश भंडारे यांच्याकडे चौकशी केली असता सहा महिन्यांपासून गाळा बंद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे रोहित याने जयदीप थोरात तसेच कंपनीचा प्रमुख प्रजापती उर्फ पंकज शुक्ला आणि एरिया मॅनेजर महेश कदम यांच्याशी संपर्क साधला. दहा तोळे सोने परत देण्याची मागणी केली. मात्र, तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश लक्ष्मण सावंत (रा. शेणोली स्टेशन, शेरे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक फौजदार सुभाष फडतरे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्करोग निदान शिबिरात शेकडो महिलांची मोफत तपासणी; सातारा शहर, तालुका, जिल्ह्यातूनही महिलांची उपस्थिती
पुढील बातमी
वाढे, वर्ये परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; प्रशासनाच्या पथकाची प्रत्यक्ष स्थळ भेट

संबंधित बातम्या