देशातील बहुचर्चित अशा स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा ने एका कार्यक्रमादरम्यान कथित व्यंगात्मक गाणे गायल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील सर्व प्रश्न संपल्याने कृणाल कामरा हाच सर्वात मोठा प्रश्न राज्यासमोर आ वासून उभा राहिल्याच्या अविर्भावाने सत्ताधारी एका डार्क कॉमेडियनवर तुटून पडलेले आहेत. राज्यातील राजकारण डागाळलेलं आहे आणि या डागाळलेल्या राजकारणामुळेच जिकडेतिकडे एक अजीर्ण डिस्क्रिमिनेशन पहायला मिळत आहे.
देशात कुणी, कुठे, काय बोलावे याला मर्यादा नसली तरी बोलणाराने आणि ऐकून घेणार्यानेही काय बोलतोय आणि काय ऐकतोय, या संबंधातील आचारसंहिता ठरवली पाहिजे. मध्यंतरी अशाच रणवीर अलाहाबादी नावाच्या यू-ट्यूबर ने आई-वडिलांच्या खाजगी आयुष्यासंदर्भातील वादग्रस्त टिप्पणी शेकडो लोकांसमोर केली होती. हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होताच देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे त्याला माफी मागून अज्ञातवासात जावे लागले. एका क्षणात रावाचा रंक होतो, हे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे.
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कोणी, काहीही बोलतोय. तीन-चारशे वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांबद्दल अक्कल पाजळून मोठी प्रसिद्धी मिळते, अशी आशा बाळगून अनेकजण अकलेचे तारे तोडतात व स्वत:चे थोबाड फोडून घेतात, हे आपण अलिकडच्या काही घटनांवरुन पाहिलेले आहे. रामाला जबरदस्तीने मटण खावू घालणारे आव्हाड असोत, किंवा राहुल सोलापूरकर, कोरटकर हे एकाच माळेचे मणी. झटका की, हलाल असा प्रश्न उपस्थित करुन सत्तेतील वाटेकरीच हातात जळता टेंभा घेवून उभे राहतात, त्यावेळी खरेतर आश्चर्य वाटते. पण विकास सोडून अशा फालतू गोष्टींना ज्यावेळी राजाश्रय मिळत असतो, त्यावेळी खर्याअर्थाने तुमच्या व आमच्यासारख्यांना विचार करण्यास भाग पाडले जाते.
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका स्टॅण्ड अप कॉमेडी शो दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराने थेट दाढीत हात घालून अवलक्षण ओढवून घेतले. परिणामी, शिंदे सैनिकांना कृणाल कामराच्या स्टुडिओत घुसून तो स्टुडिओ फोडावा लागला. कथित कवितेने घायाळ झालेल्यांनी कॅमेर्यासमोर तोडण्याची आणि फोडण्याची भाषा केली. पूर्वी तोडणे आणि फोडणे याचा कॉपिराईट फक्त ठाकरेंकडेच होता. मात्र, ओघानेच ठाकरेंच्या मुशीत तयार झालेल्यांनी हा कॉपीराईट स्वत:च्या नावावर करुन घेतला, हे आपण अलिकडच्या काळात अनुभवित आहोतच.
गेल्या दोन दिवसांमध्ये कुणाल कामरा आणि शिंदे सेना हेच माध्यमांवर दाखवले जात असल्यामुळे लोकांचेही चांगलेच मनोरंजन होत आहे. यामध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही उडी घेवून कृणाल कामरा ने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. कृणाल कामरा माफी मागेल, त्याच्यावरती पडदाही पडेल. मात्र, त्याने उपस्थित केलेल्या कवितेमुळे बाण निशाण्यावर बसला आणि या बाणाने झालेल्या जखमा न भरुन येणार्या आहेत. पोलिसांनी कुणाल दक्षिणेतील केंद्रशासित प्रदेश असलेल्या पॉंडेचेरीत असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. त्याच्यावर मुंबईतील काही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असल्याची माहितीही मिळत आहे.
कुणाल कामरा-पॉंडेचेरी- फ्रेंच कॉलनी आणि फ्रेंच म्हटल्यानंतर ओघानेच नेपोलियन बोनापार्टचा उल्लेख टाळून चालणार कसा? नेपोलियन शिवाय फ्रान्सचा इतिहासच पूर्ण होत नाही. 1818 ला ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर ताबा मिळवला. परंतू त्याअगोदरच इजिप्त जिंकून संपूर्ण सुवेझ कालव्यावरच म्हणजेच गल्फ ऑफ सुवेझ वरच आपली हुकूमत प्रस्थापित करुन ब्रिटिशांचा भारताकडे जाणारा मार्गच रोखायचा. इकडे म्हैसूरच्या टिपू सुलतानाशी हातमिळवणी करुन भारतात घुसलेल्या ब्रिटिशांची धुळधाण करायची आणि अलगदपणे संपूर्ण युनायटेड किंगडमच न लढता आपल्या घशात घालाण्याचा नेपोलियनचा हेतू होता. दुर्दैवाने मात्र फ्रान्समधील वॉटरलू येथे 18 जून 1815 मधील लढाईमध्ये युनायटेड किंगडम, रशिया, प्राशिया, ऑस्ट्रिया, स्वीडन आणि अन्य युरोपिअन राष्ट्रांनी नेपालियनवर हल्ला चढवत त्याचा पराभव केला आणि नंतर त्याला दक्षिण अटलांटिक महासागरातील छोटे बेट असलेल्या सेंट हेलेना येथे पाठविण्यात आले आणि सहा वर्षानंतर म्हणजेच 1821 साली या महान फ्रेंच योद्ध्याचा साध्या आजाराने मृत्यू झाला. 1789 साली फ्रेंच राज्यक्रांतीवेळी साधा सैनिक असणारा नेपोलियन बोनापार्ट आपल्या कर्तबगारीच्या जिवावर वयाच्या 27 व्या वर्षी फ्रेंच सैन्याचा जनरल झाला.
युरोपात आणि मध्य अशियात अनेक युद्धे करुन त्याने अनेक लढाया जिंकल्या. कालांतराने फ्रेंच जनतेमध्ये नॅशनल हिरो ठरल्यानंतर तो फ्रान्सचा सत्ताधीशी बनला. परंतू यश जेवढ्या जलद गतीने तुम्ही मिरवत जाता, त्याच पद्धतीने तुम्हाला ते पचवता आले पाहिजे. झारच्या रशियातील मॉस्कोवर गाढवाचा नांगर फिरवून हे वैभवशाली शहर बेचिराख करणार्या नेपोलियन चा सेंट हेलेनासारख्या निर्जन बेटावर अतीसामान्य मृत्यू यावा, अशी खरेतर इतिहासातील मोठी दुर्दैवी घटना. नेपोलियन ने जेवढी युद्धे जिंकली, तेवढीच युद्धे तो हरला. परंतू या पाच फूट असणार्या छोट्या चणीचा माणूस आपल्या देशातील जनतेच्या दृष्टीने नॅशनल हिरो झाला.
फ्रेंच राज्यक्रांती अगोदर धार्मिक स्वातंत्र्य नाकारणार्या व्यवस्थेला सेक्युलरिझम चा लळा लावणार्या नेपोलियनलाही जनतेने नाकारले, हाही इतिहास आहे. राजकारणात काहीच शाश्वत नसते. सत्तेत असताना उन्माद न दाखवता प्रगल्भ राजकारण केले तर इतिहासही तुमची दखल घेत असतो. बाकी, औरंगजेबाची कबर उखडून कोणाचे भले होणार नसले तरी ती उखडायलाच हवी, असा अट्टाहास केला जातोय. माणूस संपल्यानंतर त्याचे वैरत्वही संपते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधानंतर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे वेगळे काही सांगण्याची गरज नसावी.
औरंगजेबाचा खापर पणजा अर्थात मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर निवर्तल्यानंतर काही दिवसानंतर त्याच्या कबरीतील मृतदेहही अफगाणिस्तानातील काबूल येथे नेण्यात आला. त्यामुळे खुलताबाद येथील त्या कबरीमध्ये खरंच औरंगजेबाचा मृतदेह आहे की नाही, हे कोणालाही छातीठोकपणे सांगता येणार नाही. मात्र, हल्ली यावरुनही प्रश्न उपस्थित करुन राजकारण केले जात आहे. राज्यात आणि देशात प्रश्न उपस्थित करण्यासाठी भरपूर असेकाही आहे. आज भारताचा जीडीपी अर्थात जागतिक विकासदर हा तीन ट्रिलियन आहे, तर आपण ज्यांच्याशी स्पर्धा करतोय, अशा चीनचा वार्षिक जीडिपी 17.8 ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यामुळे आपण चीनच्या जवळपासही नाही. त्यामुळे आपण खरेतर विकासाचे राजकारण करायला हवे. बीपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास केला तर खर्या अर्थाने हा देश प्रगतीपथावर पोहोचणार आहे. मात्र, विकास राहिला बाजूला, नको त्या गोष्टींना सरकारमधील सहभागी असलेल्या लोकांकडूनच प्रोत्साहन मिळत आहे.
कुणाल कामराच्या निमित्ताने राजकारणातील पोरकटपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्याच्या विकासाच्यादृष्टीने प्रगल्भ राजकारण करायचे सोडून नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसून सत्ताधारी असे वागतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3 लाख 8 हजार किमी. वर्ग आहे. हेच त्या काळातील युरोपाचे 10.53 मिलीयन किमी. वर्ग होते. एक मिलीयन म्हणजे 10 लाख. याचा विचार केल्यास महाराष्ट्राचे क्षेत्रफळ याच्या जवळपासही नाही. कधीकाळी हाच युरोप नेपोलियन आपल्या खिशात घेवून फिरायचा. परंतू अती महत्वकांक्षेपोटी त्याचीही माती झाली. त्यामुळे सत्तेत असताना उतमात करायचा नाही, हा इतिहासाने दिलेला संकेत अनेक राजकारणी सत्तेत असताना पाळताना दिसून येत नाहीत.
फ्रान्सचा सत्ताधीश असणार्या नेपोलियनची जिथे माती झाली, तिथे तुम्ही आणि आम्ही किस खेत की मूली? समझने वालों को इशारा काफी है.
- संग्राम निकाळजे
संपादक
सातारा टुडे