मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी शरद कळसकर याला उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.पुणे येथील सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद काळसकर यांना याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला कळसकर याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच, अपीलावर निकाल देईपर्यंत जामीन मंजूर करण्याची मागणी त्याने केली होती. न्यायालयाने कळसकर याच्या जामिनाच्या मागणीवर सविस्तर युक्तिवाद ऐकला होता व निर्णय राखून ठेवला होता.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने बुधवारी याप्रकरणी निर्णय देताना कळसकर याची जामिनाची मागणी मान्य केली. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी तपास यंत्रणेतर्फे करण्यात आली. ती मागणी न्यायालयाने फेटाळली.पुणे येथील सत्र न्यायालयाने अंदुरे आणि कळसकर यांना दोषी ठरवताना डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या तिघांची निर्दोष सुटका केली होती. या तिघांच्या सुटकेला मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याशिवाय अंदुरे आणि कळसकर यांना बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत निर्दोष ठरवण्याच्या निर्णयालाही दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
दाभोलकर यांचे अपील काय ?
आपल्या वडिलांची हत्या ही सुनियोजित होती आणि एक मोठा कट होता. सनातन संस्था, हिंदू जन जागरण समिती आणि इतर तत्सम संघटनांविरुद्ध आपले रोखठोक मत मांडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांना संपवण्यासाठी आरोपींनी हे षडयंत्र रचले होते, असा आरोपही मुक्ता यांनी अपीलामध्ये केला आहे. या खटल्यातील शिक्षा झालेले आणि निर्दोष सुटलेले तीन आरोपी हे उजव्या विचारसरणीच्या सनातन संस्थेचे सदस्य अथवा या संघटनेशी संबंधित आहेत हे समजून घेण्यास सत्र न्यायालय अपयशी ठरले.
न्यायालयाने दोन आरोपींविरोधात गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्याचा आणि युएपीएची तरतूद लागू करण्याचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करताना मोठी चूक केली आहे. सर्व आरोपी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी होते. या वाजवी संशयाच्या पलीकडे दर्शवणारे तपास यंत्रणांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असतानाही त्यावर विचार करण्यात सत्र न्यायालय अपयशी ठरल्याचे अपीलात म्हटले आहे. तसेच युएपीएर्तंगत आरोपींविरोधात खटला चालवण्याची तपास यंत्रणेला कायदेशीररित्या परवानगी मिळाली होती, असा दावाही याचिकेत केला आहे.
कळसकर याची कारागृहातून सुटका होणार
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातही कळसकर आरोपी आहे. हा खटला अद्याप सुरू असून ऑक्टोबर २०२५ मध्ये, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कळसकर याच्यासह डॉ. वीरेंद्रसिंह तावडे व अमोल काळे यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे बुधवारच्या निर्णयामुळे कळसकर याची कारागृहातील सुटका होणार आहे.