सातारा: मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने ३० एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. सातारा जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ई-केवायसी करताना सुमारे ८५ हजार ६४ महिलांकडून विविध पर्याय निवडताना चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. या त्रुटींमुळे अनेक महिलांचा योजनेचा लाभ थांबला होता, मात्र आता मुदतवाढ मिळाल्याने उर्वरित लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्रुटी आढळलेल्या एकूण महिलांपैकी ७८ हजार २५५ महिलांनी आतापर्यंत अधिकृत पोर्टलवर आपल्या अर्जांमधील दुरुस्ती पूर्ण केली आहे. या महिलांचा योजनेचा लाभ पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आला असून प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला गती दिली जात आहे. ज्या महिलांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास सातारा येथील एस.टी. स्टँडजवळील पारंगे चौक परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रक्रियेदरम्यान आधार कार्डावरील नोंदीनुसार वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ११ हजार ५५३ महिला आणि २१ वर्षांखालील ४५६ लाभार्थ्यांचा लाभ सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. ज्या महिलांच्या आधार कार्डावर जन्मतारीख चुकीची नोंदवली गेली आहे, अशांना शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिकृत जन्म प्रमाणपत्र सादर करून आपली माहिती दुरुस्त करून घेता येणार आहे. ही दुरुस्ती झाल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. याशिवाय, जिल्ह्यातील ३४९ महिलांच्या आधार कार्डावर लिंगाची नोंद चुकीने 'पुरुष' अशी झाल्याचे समोर आले आहे. अशा महिलांनीही आपले आधार तपशील तातडीने सुधारून प्रशासनाकडे दाद मागणे गरजेचे आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दिलेल्या मुदतीनंतर आता ३० एप्रिल ही शेवटची संधी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही सुविधा केवळ ई-केवायसी करताना माहिती भरण्यात चुका झालेल्या महिलांसाठीच मर्यादित आहे. ज्या महिलांनी अद्याप एकदाही ई-केवायसी प्रक्रिया केलेली नाही, त्यांचा लाभ पूर्णतः बंद करण्यात आला असून, योजनेचे सातत्य राखण्यासाठी दिलेल्या मुदतीत त्रुटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.