सातारा : अंगणात झाडाचा पाला पडून कचरा होतो आणि तो झाडायला नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत असा राग मनात धरून पोवई नाक्यावर एका महाभागाने कचऱ्याच्या माध्यमातून झाड पेटवण्याचा प्रयत्न केला. तसा कबुली जबाब दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोडोली रस्त्यावर पारसनीस कॉलनीनजिक, शिवनेरी इमारतीमधील एका दुकानदाराने रस्त्याकडेच्या झाडाच्या बुंद्यात शुक्रवारी रात्री कचरा पेटवून दिला. या कचऱ्यामुळे झाडाला आग लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेने निदर्शनास आणून दिले. त्यावर त्या महाभागाने उर्मट भाषेत उडवा उडवीची उत्तरे दिली. झाडाचा पाला दारात पडतो. नगरपालिकेचे कर्मचारी तो झाडायला येत नाहीत, असा लंगडा युक्तिवाद तो करत होता. व्हिडिओ शूटिंग होत आहे असे सांगितले तरी त्याची दुरुत्तरे सुरूच होती. 'काय करायचंय ते करा? अशी उर्मट भाषा त्याची सुरू होती. मीपण एक पर्यावरण प्रेमी आहे ' असा दावाही त्याने केला.
रस्त्याकडेच्या झाडांना आग लावून त्यांचे उच्चाटन करणाऱ्या या महाभागावर नगरपालिका फौजदारी गुन्हा दाखल करणार का नेहमीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप पुढे नांगी टाकणार, हे लवकरच स्पष्ट होईल.